औरंगाबाद : वय अगदी १४ वर्षे...मात्र, खेळण्या-बागडण्याच्या या वयात अचानक एके दिवशी मानसिक आजाराचा विळखा पडतो आणि त्यातून चिमुकला पित्यावरच हल्ला करतो. या हल्ल्याची हा पिता थेट पोलिसांत तक्रार देतो; पण मुलाप्रती असलेली जबाबदारी पिता झटकत नाही. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही मुलाचे चुकीचे वागणे पोटात घालून त्याला मानसिक आजारातून बाहेर काढण्यासाठी हा पिता धडपड करीत आहे.
वैजापूर येथील रहिवासी राजेश (नाव बदलले) यांचे दोन मुली, लहान मुलगा आणि पत्नी असे छोटेसे कुटुंब. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा १४ वर्षांचा मुलगा अभिजित (नाव बदलले) याच्या वर्तणुकीत दोन वर्षांपूर्वी अचानक बदल झाला. तो तेव्हा ७ वी शिकत होता. शाळेत जाण्यासाठी निघाल्यावर तो अर्ध्यातूनच परत येऊ लागला. काही दिवसांनी घरात झोपून राहत होता. प्रत्येकाशी ओरडून बोलू लागला. सुरुवातीला घरात कोणाच्या लक्षात आले नाही; परंतु अभिजितची वागणूक अधिक आक्रमक झाल्याने कोणी काही तरी केले, या विचारातून ज्येष्ठांच्या सल्लाने या ना त्या ठिकाणी दाखविले; पण फारसा फरक पडला नाही. अशातच अनेक दिवस निघून गेले.
दोन महिन्यांपूर्वी अभिजितने अचानक राजेश यांच्यावर हल्ला केला. हल्ला करताना जिवे मारण्याचीही धमकी दिली. हा प्रकार सर्वांना धक्का देणारा होता. त्यामुळे राजेश यांनी आपल्याच मुलाची पोलिसांत तक्रार नोंदविली. याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली. मुलाला लहानाचे मोठे करताना तळहाताचा पाळणा आणि नेत्राचा दिवा करून लहानाचे मोठे केले. त्यामुळे या प्रकारानंतरही राजेश यांनी मुलाकडे दुर्लक्ष केले नाही. मुलाला आजारातून बाहेर काढण्यासाठी ते धडपत आहेत. त्यांनी अभिजितला घाटी रुग्णालयातील मानसोपचार आंतररुग्ण विभागात दाखल केले. या ठिकाणी सहायक प्राध्यापक डॉ. संजय घुगे आणि त्यांच्या सहकार्यांनी अभिजितवरील उपचारासाठी परिश्रम घेतले.
गेले वीस दिवस अभिजितवर झालेल्या उपचाराने त्याचा आक्रमक स्वभावात नियंत्रण आणण्यात डॉक्टरांना यश मिळाले; परंतु पुढील उपचारासाठी मनोरुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. त्यामुळे या पित्याची थोडी अडचण आणखी वाढली. औरंगाबादेत शासकीय मनोरुग्णालय नाही. त्यामुळे घाटीतून सुटी घेऊन पुढील उपचारासाठी मुंबई अथवा पुणे येथील मनोरुग्णालय गाठवे लागणार आहे. तरीही खचून न जाता ते प्रयत्न करीत आहेत.
दररोजचा आहार देणे अवघडया मानसिक आजारात चिडचिडपणा, कोणालाही न ओळखणे, अचानक हल्ला करणे अशी वर्तणूक होते. शिवाय अभिजितला खूप भूक लागते. भूक लागल्यावर तो अधिक चिडचिड करतो. यावर नियंत्रण येण्यासाठी केसर, बदाम, अक्रोड, चणे, फुटाणे, तूप असा आहार आहारतज्ज्ञांनी दिला आहे; परंतु आर्थिक परिस्थितीने हा आहार देणे या पित्याला जड जात आहे. के. के. ग्रुपने यासाठी मदतीला हात दिला.
वागणुकीवर नियंत्रणअशाप्रकारचे मानसिक आजार सध्या लहान मुलांमध्ये फार दिसत आहेत. अशा मुलांवर औषधोपचारांसोबत पालकांना पालकत्वासंदर्भात योग्य मार्गदर्शन केले जाते. सदर मुलावरील उपचार तसे अवघड होते. तरीही सर्व परिस्थितीचा विचार करून त्याच्या वागणुकीवर नियंत्रण आणले. आहारतज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली. त्याच्यावर पुढील उपचार हायर सेंटरमध्ये होतील.- डॉ. संजय घुगे, सहायक प्राध्यापक, मानसोपचार विभाग, घाटी