दयाशील इंगोले, संतोष भिसे । लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मोबाईलच्या सतत वापरामुळे चिमुकल्यांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होत आहेत. लहान मुलांना चष्मा लागणे, शिवाय डोळ्याचे विविध आजारांचे चिमुकले शिकार बनत चालले आहेत. त्यामुळे मुलांना मोबाईलपासून दूरच ठेवावे असा डॉक्टरांतून सल्ला जरी असला तरी दिवसेंदिवस मोबाईलकडे लहान मुलांचा कल वाढतच असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले. मोबाईलसाठी लहान मुलांकडून होणारा हट्ट त्यांच्यासाठी घातक ठरत आहे. जवळपास सर्वांकडेच आता अॅन्ड्रॉईड मोबाईल उपलब्ध आहेत. मोबाईलमध्ये गेम खेळणे किंवा लहान मुल रडत असल्यास त्याची समजूत काढण्यासाठी घरातील मंडळी चिमुकल्यांच्या हाती मोबाईल देतात. परंतु नकळत त्यांना मोबाईल वापराची सवय जडत जाते. मोबाईलकडे लहान मुलांचा कल वाढतोय असे म्हणणारे जास्त आहेत. तर नाही म्हणणारे कमी आहेत. मोबाईलवर लहान मुले जास्त वेळ खेळतात, असे म्हणणारे कमी आहेत. अर्धा तास मुले मोबाईलव खेळतात, यांची संख्या जास्त तर खेळूच देत नाही म्हणणारे बोटावर मोजता येतील एवढे आहेत. कुटुंबातील एका सदस्याकडे अॅन्ड्रॉईड मोबाईल जास्त असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. दोन व तीन मोबाईल आहेत, असे म्हणणारे फार कमी आहेत. प्रत्येक वेळी त्यांना मोबाईल देणे शक्य नसते, अशावेळी चिमुकले चिडचिड करतात, तर काही मुले पालकांनी सांगितलेले काम ऐकत नाहीत, असे म्हणणारे काही प्रमाणात आहेत. तर काही जण अभ्यासाकडेही दुर्लक्ष करतात असे म्हणणारे सर्वात कमी आहेत. मुलांना काही प्रमाणात मोबाईल दिला पाहिजे होय म्हणणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे, तर नाहीच म्हणणारे त्यापेक्षा कमी तर काही प्रमाणात मोबाईल मुलांच्या हाती द्यावा म्हणणारे जास्त प्रमाणात आहेत.लहान मुलांच्या हातात मोबाईल द्यावा किंवा नाही, याबाबत पालकांत संभ्रम आहे. दिल्यास मोबाईल वापरण्याची सवय जडल्यास लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होणार, हे मात्र निश्चित आहे. याबाबत डॉ.गोपाल कदम म्हणाले, लहान मुलांमधील मोबाईलमॅनिया वाढत आहे. मात्र मुलांना ही सवय न लागण्याची काळजी पालकांनीच घेणे गरजेचे आहे. त्यापेक्षा त्यांना मैदानी खेळांकडे वळविले पाहिजे. त्यांना पुरेसा वेळ दिला पाहिजे. पूर्वी मोठे कुटुंब असल्याने आई-वडिलांशिवाय इतरांचे मुलांवर लक्ष असायचे. आता त्रिकोणी कुटुंबात ते शक्य होत नाही. मग मोबाईल मुलांच्या हाती दिला जातो. जेकी अत्यंत चुकीचे आहे. त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. एवढेच काय तर मोबाईल गरज म्हणून दिला तरीही किशोरवयीन मुलेही मोबाईलचा वापर नेमका कसा करतात, हेसुद्धा पालकांनी तपासले पाहिजे.
चिमुकल्यांच्या मोबाईलवेडाची पालकांना चिंता
By admin | Published: July 15, 2017 12:09 AM