छत्रपती संभाजीनगर : आईवडिलांनी मोबाईल खेळण्यास नकार दिल्याच्या कारणावरून १५ वर्षांच्या मुलीने थेट घर सोडले. वेदांतनगर पोलिसांनी शोध घेतल्यानंतर गुरुवारी दुपारी ती जालना शहरात सापडली. यानंतर तिला शहरात आणण्यात आले.
१५ वर्षीय कल्पना (नाव बदलले आहे) आईवडिलांना एकुलती एक मुलगी आहे. आईवडील दोघेही खासगी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. कल्पनाने अभ्यास करावा, असे त्यांना कायम वाटते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कल्पनाचा सातत्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते. त्यातच शिवाय मोबाईलचा वापर वाढला होता. आईवडिलांनी तिला रागावणे सुरू केले होते. २९ जुलै रोजी कल्पना पुन्हा मोबाईल मध्ये गुंग झाल्याने आईवडिलांनी तिला खडे बोल सुनावले. त्याचा कल्पनाला राग आला. मैत्रिणीकडे चालल्याचे सांगून तिने सायंकाळी ६ वाजता घर सोडले. नेहमीप्रमाणे काही तासांनी घरी येईल, असे आईवडिलांना वाटले. मात्र, रात्र उलटूनही कल्पना घरीच न परतल्याने ते पुरते घाबरून गेले होते.
रात्रभर सर्वत्र कल्पनाचा शोध घेऊनही मिळून न आल्याने घाबरलेल्या पालकांनी वेदांतनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. निरीक्षक प्रविणा यादव यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे यांना तपास सुरू केला. तिच्या जवळच्या मैत्रिणींची चौकशी केल्यावर ती सिडको बसस्थानकाच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. निरीक्षक प्रविणा यादव, उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे यांनी तांत्रिक तपास केल्यावर कल्पना जालन्याच्या दिशेने गेल्याचे कळाले. मुंडे सहकाऱ्यांसह जालन्याला रवाना झाले. तेथील तिच्या मैत्रिणीचे घर गाठताच कल्पना सुरक्षित मिळून आली. त्यानंतर तिने आईवडिलांचे सततचे रागावणे, मोबाईल खेळण्यास नकार दिल्याच्या कारणातून घर सोडल्याची कबुली दिली.