लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बालक कुपोषित असल्याने उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात गुरुवारी सकाळी ९ वाजता आणले. सायंकाळी सहाच्या दरम्यान पाणी आणण्याचा बहाणा करून नर्सची नजर चुकवीत कुपोषित बालकासहित पालकांनी धूम ठोकली होती. शुक्रवारी दुपारी १२ वाजता सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने त्यांना पुन्हा रुग्णालयात आणण्यात आले. ते रूग्णालयात येताच आरोग्य प्रशासनाने सुटकेश्वाच निश्वास सोडला.शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करताना माजलगाव तालुक्यातील केसापुरी कॅम्प परिसरातील प्रियंका राजाभाऊ खरात ही दीड वर्षाची चिमुकली कुपोषित असल्याचे समोर आले होते. त्यानंतर परिसरातील इतर पालांवरही जाऊन पाहणी केली असता आणखी दोन मुली या ठिकाणी तीव्र कुपोषित असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर या तिघींना जिल्हा रुग्णालयात गुरूवारी सकाळी ९ वाजता दाखल केले होते. रुग्णालयास भेट दिली असता तेथे तब्बल ११ बालक कुपोषित असल्याचे धक्कादायक वास्तव पाहावयास मिळाले होते.याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून आरोग्य विभागाच्या नजरेस ही बाब आणून दिली. त्यानंतर शुक्रवारी आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हा रुग्णालयासह जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राथमिक ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.दरम्यान, गुरुवारी सायंकाळी माजलगाव तालुक्यातील सादोळा परिसरातील खरात दाम्पत्याने कुपोषित असलेल्या प्रियंकासह पाणी आणण्याचा बहाणा करीत धूम ठोकली. बराच वेळ झाल्यानंतर खरात दाम्पत्य न परतल्याने रुग्णालय वॉर्डमधील परिचारिकांनी ही माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. हनुमंत पारखे यांना दिली. त्यांनी लगेच रुग्णालयात धाव घेत कर्मचाऱ्यांसह दाम्पत्याचा शोध घेतला; परंतु ते मिळाले नाहीत. याची माहिती डॉ. नागेश चव्हाण यांना दिली. त्यानंतर डॉ. चव्हाण यांनी पोलीस चौकीत याबाबत तक्रार दिली.
कुपोषित बालकासह पालकाची धूम...
By admin | Published: July 15, 2017 12:40 AM