खुलताबाद: दोन महिने ब्रेक घेऊन भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे पुन्हा राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. त्यांनी आज (४ सप्टेंबर) सकाळी बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेवून शिवशक्ती परिक्रमेला सुरूवात केली आहे.
वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदीर परिसरात पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रेचे या वेळी कार्यकर्त्यांनी वाजत गाजत जोरदार स्वागत केले. श्री घृष्णेश्वर मंदीरात जावून महापुजा अभिषेक करून दर्शन घेऊन शिवशक्ती परिक्रमा सुरू केली. शिव आणि शक्तीच्या दर्शनाबरोबरच जनता जनार्दनाच्या दर्शनासाठी ही परिक्रमा आहे. जनतेचे हे प्रेम अबाधित राहो, असे या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी राज्यात शिवशक्ती यात्रा काढत धार्मिकस्थळांना भेटी देण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून त्या लोकांनाही भेटणार असून, त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर त्या अडगळीत पडल्याचे चित्र आहे. याबद्दल त्यांनी अनेकदा नाराजीही व्यक्त केली. पंकजा मुंडे यांचा हा दौरा श्रावण मासामुळे महादेवांच्या म्हणजे शिवांच्या पूजेसाठी काढण्यात येत आहे. त्याचबरोबर शक्तीचे प्रतीक असलेल्या सप्तशृंगी मातेचे दर्शन या दौऱ्यात पंकजा मुंडे घेणार आहेत.
वेरूळ मंदीरात श्री घृष्णेश्वर मंदीर देवस्थान च्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे, शहराध्यक्ष सतीश दांडेकर, संदीप निकम, विकास कापसे, सुरेश मरकड, परसराम बारगळ, दिनेश अंभोरे, राहुल निकुंभ, गणेश हजारी, सुखदेव ठेंगडे आदीसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.