पैठण : नाताळमुळे सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी पैठण नगरीत पर्यटक दाखल झाले, मात्र संत ज्ञानेश्वर उद्यान बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे तीनही दिवस आलेल्या हजारो पर्यटकांना उद्यान न पाहताच माघारी परतावे लागले.
मैसूर, वृंदावन येथील उद्यानाच्या धर्तीवर पैठण येथे शासनाने जायकवाडी धरणाच्या निर्मितीनंतर संत ज्ञानेश्वर उद्यानाची उभारणी केली. मात्र, काही दिवसातच संत ज्ञानेश्वर उद्यानाची दुरवस्था झालेली आहे. कोरोनाकाळात बंद करण्यात आलेले उद्यान अद्यापही खुले करण्यात आलेले नसल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.
संत ज्ञानेश्वर उद्यान पर्यटकांसाठी खुले करा, अशी मागणी पवन लोहिया यांनी केली आहे. ते म्हणाले की, पैठणचा बहुतांश व्यापार पर्यटनावर अवलंबून आहे. उद्यान बंद असल्याने पर्यटनालाच खीळ बसली आहे. व्यवसायावर अवलंबून असलेल्या व्यापारी, कामगार यांना याचा मोठा फटका बसत आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या दरम्यान पर्यटक पैठण शहरात हजेरी लावतात.
फोटो : पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान बंद असल्याने जिल्हाभरातून आलेल्या पर्यटकांना उद्यानाच्या गेटवरूनच माघारी फिरावे लागल्याचे चित्र दिसून आले.