उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या नेतृत्वात तज्ज्ञ व अधिकाऱ्यांच्या समितीद्वारे शहरातील पार्किंग धोरण, फेरीवाल्यांचे झोन यावर पॉलिसी तयार केली जात आहे. शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या कार्यालयात यासंदर्भात गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांच्या उपस्थितीत पार्किंग, फेरीवाल्यांच्या नियंत्रणासाठी उपायांवर चर्चा करण्यात आली. नगररचना उपअभियंता संजय कोंबडे, मालमत्ता कर विभागाचे शेख मोईन, श्रीनिवास देशमुख, पल्लवी देवरे, मधुरा कुलकर्णी, करण ठाकूर, सारंग टाकळकर यांची यावेळी उपस्थिती होती.
या बैठकीपूर्वी निराला बाजार, कॅनॉट गार्डन आणि उस्मानपुरा येथील दुकानदार तसेच रहिवाशांची बैठक घेण्यात आली. येथील बाजारपेठ क्षेत्रातील व्यावसायिक दुकानदारांद्वारे सार्वजनिक जागेच्या अतिक्रमणाचा आढावा घेण्यासाठी पालिकेतर्फे एक पथक नेमले जाईल, असा निर्णय घेण्यात आला. वाहनांच्या पार्किंगसाठी रेखांकन, पथविक्रेत्यांच्या नियोजनासंबंधी यावेळी निर्णय झाला. पालिका प्रथम नो हॉकर्स झोन घोषित करेल. त्यानंतर नियोजित झोनमध्ये पथ विक्रेत्यांना थांबण्यास परवानगी दिली जाईल, असे नियोजन केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.