औरंगाबाद : जिल्ह्यात ११ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन असल्याचे रविवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जाहीर केले. रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत या काळात लॉकडाऊन असणार आहे.
जिल्हा टास्क फोर्सची बैठक रविवारी जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी झाली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोनासंदर्भात १५ फेब्रुवारीपासूनच्या स्थितीचा आढावा घेतला. औरंगाबादसारख्या शहरातील कोरोना संसर्ग, उपचार, हॉस्पिटल, सेवा-सुविधांवर चर्चा झाली. आरोग्य विभागातील सर्व तज्ज्ञांसोबत चर्चा केली.
३ हजार रुग्ण सध्या जिल्ह्यात आहेत. दोन दिवसांपासून ४०० च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्योग संघटना, व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर १०० टक्के लॉकडाऊन करण्यापेक्षा अंशत: लॉकडाऊन करण्यावर एकमत झाले आहे. ११ मार्चपासून अंशत: लॉकडाऊनची सुरुवात होणार आहे. साधारणत: ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असेल. या काळात रुग्णवाढ झाली तर १०० टक्के लॉकडाऊन करण्याचा पर्याय प्रशासनसमोर असेल.
शहरात ११ मार्चपासून कोणत्याही राजकीय, धार्मिक सभा होणार नाहीत. सर्व राजकीय आंदोलने, धरणे, मोर्चांवर बंदी असेल. शहरातील सर्व आठवडी बाजार बंद असतील. सर्व जलतरण तलाव बंद असतील. क्रीडा स्पर्धा घेता येणार नाहीत. सरावासाठी कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळल्यास परवानगी असेल.
शहरातील महाविद्यालये, विद्यापीठ, शाळा, कोचिंग क्लास बंद राहतील. या सर्वांना ऑनलाइन अध्यापनाची परवानगी आहे. राष्ट्रीय, राज्य पातळीवर भरतीच्या परीक्षा ज्यांचे हॉलतिकीट देण्यात आले आहेत. मार्गदर्शक सूचनांचे पालन करून याबाबत निर्णय होईल.
शहरातील सभागृहे, मंगल कार्यालये, लॉन्सवर बुक असलेले सर्व विवाह समारंभ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नोंदणी पद्धतीने विवाह पद्धत सुरू राहील. हॉटेल्स, परमीट रूम, खाद्य दुकाने व इतर दुकाने रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहतील. ९ नंतर एकूण क्षमतेच्या ५० टक्केच सुरू राहतील. होम डिलिव्हरी ११ वाजेपर्यंत सुरू राहील. ग्रंथालय, लायब्ररी ५० टक्के क्षमतेत सुरू राहील.
शनिवार, रविवार १०० टक्के लॉकडाऊन असेलया दिवशी वैद्यकीय सेवा, वृत्तपत्रे, दूध, भाजीपाला, जीवनाश्यक दुकाने, उद्योग, कारखाने, बांधकामे, सर्व वाहतूक सेवा सुरू राहतील. आस्थापनेतील सर्व कर्मचाऱ्यांची दर १५ दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. त्याचे प्रमाणपत्र त्यांच्याजवळ असले पाहिजे. मॉल्स बंद राहतील. मांसविक्री, गॅरेज, बँका सुरू राहतील. या काळात दुकाने, बाजारपेठा, मॉल्स, चित्रपटगृह, नाट्यगृहे बंद राहतील. हॉटेल्समध्ये बसून जेवण मिळणार नाही. होम डिलिव्हरी सुरू राहील. सर्व खाजगी कार्यालये, सरकारी कार्यालये अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू राहतील. रिक्षांनी प्रवासी मर्यादा पाळली पाहिजे.