औरंगाबाद : अंशत: लाॅकडाऊन पहिल्याच दिवशी गुरुवारी जालना रोडवर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षांचे प्रमाण काहीसे कमी राहिले. कारवाईची भीतीबरोबर कोरोना रोखण्याची आमचीही जबाबदारी म्हणून अनेकांनी दोनच प्रवासी नेण्यास प्राधान्य दिला, पण त्याच वेळी दोन प्रवाशांच्या वाहतुकीतून इंधन खर्चही निघत नाही. घर कसे चालवायचे, कुटुंब कसे सांभाळायचे? असा सवाल उपस्थित करीत काहींनी दोनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली.
अंशत: लाॅकडाऊनदरम्यान रिक्षांमधून दोनच प्रवाशांची वाहतूक करता येणार आहे. दोनपेक्षा अधिक प्रवासी आणि मास्क नसेल तर कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशा सक्त सूचना आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांना केल्या. रिक्षाचालकांनी मास्कचा वापर केला पाहिजे. रिक्षाचालकांनी, प्रवाशांनी मास्कचा वापर करावा, अशा सूचना आहेत. त्यानुसार गुरुवारी रिक्षाचालक आणि मास्कचा वापरत करताना दिसून आले. जालना रोड, रेल्वेस्टेशन, बसस्थानक परिसरात काही रिक्षाचालक दोनच प्रवाशांना घेऊन जात होते. त्यासाठी भाडे अधिक आकारले जात होते. काहींनी मात्र, कमी भाडे घेत अधिक प्रवासी वाहतूक सुरूच ठेवली होती.
रिक्षाचालक म्हणाले...रिक्षाचालक गणेश ठोले म्हणाले, दोन प्रवाशांच्या वाहतुकीतून इंधनाचा खर्चही निघत नाही. आधीच प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. किमान तीन प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी मिळाली पाहिजे. आधीच्या लाॅकडाऊनच्या परिणामातून आता कुठे सावरत होतो. मात्र, आता पुन्हा नव्या लाॅकडाऊनमुळे दोन प्रवाशांची वाहतूक करण्याची सूचना आहे. याचाही फटका सहन करावा लागत असल्याचे काही रिक्षाचालकांनी म्हटले.
दोन दिवस सूचना, नंतर कारवाईपहिलाच दिवस असल्याने कारवाईऐवजी रिक्षाचालकांना दोनच प्रवासी वाहतूक करण्यासंदर्भात सूचना करण्यास प्राधान्य दिला. दोन दिवसांनंतर अधिक प्रवासी वाहतूक करणार्या रिक्षांवर कारवाई केली जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार म्हणाले.
जिल्ह्यातील एकूण रिक्षा- ३५,७८२शहरात धावणाऱ्या- ३०,०००रिक्षाचालकांची संख्या- ४५,०००