पैठण : औरंगाबाद शहरात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत हे खरे असले तरी ग्रामीण भागात मात्र याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अशी परिस्थिती असतानाही प्रशासनाने सरसकट संपूर्ण जिल्ह्यात लावलेल्या लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील व्यापारी व हातावर पोट असलेल्या गोरगरीब नागरिकात मोठी नाराजी पसरली आहे. निर्बंध कडक करा परंतु गरज नसताना लॉकडाऊन लागू करून गरिबांच्या पोटावर मारू नका अशा तीव्र भावना जनतेतून व्यक्त होत आहेत.
प्रशासनाने दि ११ मार्च ते ४ एप्रिल या दरम्यान जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन लागू केला आहे. या काळात प्रत्येक शनिवार व रविवार असे दोन दिवस पूर्ण लॉकडाऊन घोषित केला आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या लॉकडाऊनमुळे बिघडलेली आर्थिक घडी जेमतेम रुळावर येत असतानाच पुन्हा निर्बंध लागल्याने शेतकरी, व्यापारी व हातावर पोट असलेल्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पैठण तालुक्यात कोरोना रूग्णांचा दैनंदिन अहवाल लक्षात घेतला तर आठवड्यात एक किंवा दोन रूग्ण सापडत आहेत. यामुळे पैठण तालुक्यात अंशतः लॉकडाऊन लागू करण्यासारखे ठोस कारण नाही असे व्यापाऱ्यांचे मत आहे. पुन्हा एकदा निर्बंध लागू झाल्यामुळे बहारात आलेला व्यवसाय पुन्हा अडचणीत येणार असल्याने व्यापारी धास्तावले आहेत.
प्रशासनाने विचार करावापैठण तालुक्यात कोरोनाचे रूग्ण संख्या व प्रमाण फारच कमी आहे. लॉकडाऊन मुळे व्यापार व व्यापारावर अवलंबून असलेल्या कुटुंबांना मोठा फटका बसतो. पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन मुळे झालेल्या आर्थिक व मानसिक धक्क्यातून व्यापारी अजून सावरलेले नाही. निर्बंध कडक करा आमची काहीच हरकत नाही. परंतु, लॉकडाऊन बाबत प्रशासनाने फेरविचार करावा अशी प्रतिक्रिया व्यापारी नंदलाल लाहोटी यांनी दिली.
पगार कपात झाली
शनिवार व रविवार कडक लॉकडाऊन आणि सोमवारी पैठण बाजारपेठ बंद असते. यामुळे आठवड्यात तीन दिवस दुकाने बंद राहणार आहे. सध्या व्यवसाय कमी झालेला असून त्यातच असे निर्बंध लागू झाल्याने जवळपास ५०% पगार कपात झाली आहे. या पगारात उदरनिर्वाह कअसा करणार अशी प्रतिक्रिया एका दुकानातील कामगाराने दिली.
जिल्हा प्रशासनास निवेदन देणारलॉकडाऊनचा फेरविचार करावा यासाठी पैठण शहरातील व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ तहसीलदार यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना निवेदन देणार आहेत अशी माहिती व्यापारी महासंघाचे पवन लोहिया यांनी दिली.