- मेहमुद शेख
वाळूज महानगर: उद्योगनगरीतुन तीन आठवड्यापासून बेपत्ता असलेले बांधकाम व्यवसायिक किशोर बाबुराव लोहकरे (४०, रा. कमळापूर) यांचा मृतदेह आज बुधवार (दि.९) सकाळी ९ वाजेच्या सुमारास मध्यप्रदेशात मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. मारेकऱ्यांनी लोहकरे यांचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
किशोर बाबुराव लोहकरे (४०, रा.कमळापूर, ता.गंगापूर) हे बांधकाम व्यवसायिक १७ सप्टेंबरला सकाळी ७ वाजेच्या सुमारास घरातून १० लाख रुपये सोबत घेत कारचालक जावेद सत्तार शेख (रा.कमळापूर) याच्यासह मुंबईला कामानिमित्त गेले होते. दोन दिवसानंतर १९ सप्टेंबरला चालक जावेद शेख हा एकटाच कार घेऊन कमळापूरात आला. त्याने आशा लोहकरे यांच्याकडे सोबत नेलेले १० लाख रुपये परत करीत किशोर लोहकरे हे मुंबईत थांबल्याचे सांगितले होते. दरम्यान, २६ सप्टेंबरला आशा यांना किशोर यांनी फोन करून मी इंदौर असून चालक जावेद शेख यास १० लाख रुपये आणि कार घेऊन इंदौरला पाठवून दे, असे सांगितले. त्यानुसार जावेद शेख १० लाख रुपये घेऊन इंदौरला गेले. येथे किशोर लोहकरे यांनी पैसे घेऊन चालक शेख यास परत पाठवले. तसेच आशा यांना मी कामानिमित्त कोलकत्ता येथे जात असल्याचे सांगितले. दरम्यान, २७ सप्टेंबरला चालक शेख हा कार घेऊन कमळापूरात आला. त्यानंतर २८ सप्टेंबरला आशा यांनी पती किशोर यांना संपर्क केला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याचे आढळले. किशोर यांचा काहीच संपर्क होत नसल्याने आशा यांनी ३ ऑक्टोबरला वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
मध्यप्रदेशातील जंगलात आढळला जळालेला मृतदेहकिशोर लोहकरे हे बेपत्ता झाल्यामुळे नातेवाईक व मित्रमंडळी मध्यप्रदेशात जाऊन शोध घेत होते. दरम्यान, आज, बुधवारी मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील बिंजलवाडा येथील जंगलात अर्धवट जळालेल्या व कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. पोलिसांनी लोहकरे यांच्या नातेवाइकांना ओळख पटविण्यासाठी बोलवले. मृतदेहाच्या अंगावरील खुणा, हातातील अंगठीवरुन नातेवाईकांनी मृतदेह किशोर लोहकरे यांचाच असल्याचे पोलीसांना सांगितले.
खुनाचे कारण अस्पष्ट; फरार मारेकऱ्यांचा शोध सुरुबांधकाम व्यवसायिक किशोर लोहकरे यांच्या मारेकऱ्यांचा आणि कारणांचा पोलिस शोध घेत आहेत. लोहकरे यांच्या संपर्कातील काही जणांची पोलीसांकडून चौकशी सुरु आहे. अर्थिक देवाण-घेवाण की अन्य कारणाने किशोर लोहकरे यांचा खुन करण्यात आला याविषयी उद्योगनगरीत उलट-सुलट चर्चा सुरु आहे. दरम्यान, खुनाची घटना मध्यप्रदेशात घडल्याने मध्यप्रदेश पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. एमआयडीसी वाळूज पोलीसांना याप्रकरणातील महत्वाचे धागेदोरे हाती लागले असून मारेकरी लोहकरे यांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.