लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : येथील धूत ट्रान्समिशनने भारतात इलेक्ट्रो-मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक स्विचेसची निर्मिती आणि विक्रीसाठी अमेरिकेतील कनेक्टिकट येथील कार्लिंग टेक्नॉलॉजीजबरोबर संयुक्त भागीदारीसाठी सामंजस्य करार केला आहे.नव्या भागीदारी कंपनीचे नाव अद्याप निश्चित नाही. कंपनीचे मुख्यालय औरंगाबादमध्ये असेल. या संयुक्त भागीदारीतील कंपनीकडून निर्मित उत्पादने ही भारतातील दुचाकी, तीनचाकी आणि वाणिज्य वाहने, कृषी आणि बांधकाम उपकरणांच्या बाजारपेठेला पुरविली जातील. त्या उत्पादनांची कार्लिंग टेक्नॉलॉजीजच्या नेटवर्कने विदेशात निर्यात केली जाईल.कार्लिंग टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी उपाध्यक्ष ख्रिस्तोफर सोरेन्सन कराराप्रसंगी म्हणाले, धूत ट्रान्समिशनशी भागीदारी होणे ही घटना उत्साहवर्धक आहे. या करारामुळे भारतातील आमचा पाया आणखी मजबूत होईल. या भागीदारीतून भारताच्या वाहन उद्योगातील बाजारपेठेतील विविध पैलूंची माहिती होईल. शिवाय उत्पादनांच्या स्थानिकस्तरावर निर्मितीमुळे ते किफायतशीर किमतीला पुरविणे शक्य होणार आहे.मुंबईचे जागतिक गुंतवणूक सल्लागार बँकिंग संस्था सिंघी अॅडव्हायजर्सने धूत ट्रान्समिशनच्या या करारात अंतर्गत सल्लागाराची भूमिका बजावली. धूत ट्रान्समिशनचे व्यवस्थापकीय संचालक राहुल धूत या करारासंबंधी म्हणाले, जागतिकस्तरावर असलेले बँ्रडनेम आणि आमच्या व्यावसायिक दृष्टिकोनाशी अनुकूल असलेल्या कार्लिंग टेक्नॉलॉजीजशी सामंजस्य करार होणे खूप आनंददायी आहे. आजवर आमच्यासाठी उपेक्षित राहिलेल्या बाजारपेठेत शिरकावासाठी ही भागीदारी उपयुक्त ठरेल. कार्लिंग टेक्नॉलॉजीजचे तंत्रज्ञान उत्पादनासाठी महत्त्वाचे ठरेल. २०१८ मध्ये ही भागीदारी अंमलात येणे अपेक्षित आहे.
धूत ट्रान्समिशनची ‘कार्लिंग’सोबत भागीदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:41 AM