औरंगाबाद: लॉकडाऊन शनिवार आणि रविवारी कडक केल्याने कारवाईच्या भीतीने अनेक रिक्षाचालकांनी घरीच राहणे पसंत केले तर हातावर पोट घेऊन फिरणाऱ्यांनी अव्वाच्या सव्वा दामदुपटीत प्रवाशांना रेल्वेस्थानक, बसस्थानक अशा फेऱ्या मारल्या.
कोविड-१९चा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कोरोना साखळी तोडण्यासाठी शासनाने पुन्हा कडक पाऊले उचलून लॉकडाऊनची घोषणा केली. ११ मार्चपासून रात्रीची संचारबंदी लागू केली असून, शनिवार आणि रविवार पूर्ण दिवस लॉकडाऊन केले आहे. त्यातील शनिवारी रस्त्यावरील रहदारी पूर्णत: ओसरलेली दिसत होती. कारणास्तव वाहने फिरताना आढळून येत होती. अत्यंत महत्त्वाचे असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घरातच राहून कोरोनाच्या साखळीला तोडणे गरजेचे आहे. त्यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
रेल्वे स्थानक किंवा बसस्थानकावर आलेल्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी रिक्षाशिवाय दुसरे साधन नव्हते. रस्ते पूर्णत: सुनसान झालेले दिसत होते. अशा प्रसंगी रिक्षाचालकांकडून जास्तीचे भाडे वसूल केले. कारवाईच्या भीतीनेदेखील एका रिक्षात फक्त दोनच प्रवासी घेऊन रिक्षाचालक फिरताना आढळून आले.
गतवर्षीसारखे लॉकडाऊन वाढू नये..
शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर सामान्य जनतेचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. हातावर पोट घेऊन फिरताना चारपैके जमा करणे आणि त्यातून बचत करणे, तसेच कुटुंब चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. लॉकडाऊन वाढल्यास रिक्षाचालक कुटुंबीयांनी काय करावे, असा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
दवाखान्याजवळ आढळल्या रिक्षा..
रिक्षाची संख्या पूर्णत: रोडावलेली होती; परंतु संधीचा फायदा घेण्यासाठी काही रिक्षाचालकांनी दामदुप्पट भाडे वसूल करून वरकमाई काढण्यावर भर देताना दिसत होते.
प्रवाशांनीदेखील पैसे देऊन घर गाठणे किंवा दवाखान्यात जाण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे दवाखान्याच्या परिसरात रिक्षा आढळून येत होत्या.
नको ती कारवाई...
कारवाईच्या भीतीने घरीच रिक्षा ठेवल्याचे आढळून येत होते. ऑनलाइन पावत्या मोबाइलवर येऊन धडकत असल्याने अनेक रिक्षाचालकांनी कमाई दमडीची होणार नाही आणि दंड भरावे लागेल दुप्पट म्हणून रिक्षा रस्त्यावर काढल्या नाहीत.
कॅप्शन
दोन प्रवाशांना घेऊन रस्त्यावर अशा रिक्षा अधून-मधून चालविताना दिसून येत होत्या.