औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कडक निर्बंध लावण्यात आले आहे. यात एसटी बसेस या अत्यावश्यक सेवेसाठीच धावत आहेत. पण दोन दोन तास उभे राहूनही अत्यावश्यक सेवेसाठी प्रवासी मिळत नाही आणि ज्यांना कुठे जायचे आहे, ते प्रवासी अत्यावश्यक सेवेत येत नाही, अशी अवस्था सध्या शहरातील सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानकात पहायला मिळत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या ताफ्यात ५०० बसचा ताफा आहे. परंतु सध्या या बसेस आगारातच उभा करण्याची वेळ ओढवत आहे. अत्यावश्यक सेवेसाठी बस सुरू असल्याचे सांगितले जाते. परंतु अत्यावश्यक सेवेसाठी जाणारे दोन-चार प्रवासी आले तरी बस धावत नाही. कारण उत्पन्नाचा प्रश्न आहे. प्रवासी मिळण्याच्या प्रतीक्षेत बस तास दीड तास फलाटावरच उभी राहते. शेवटी अत्यावश्यक कामांसाठी जाणारे प्रवासी कंटाळून आगाराबाहेर पडतात आणि खासगी वाहनांचा रस्ता धरत असल्याची परिस्थिती आहे. त्या उलट अत्यावश्यक सेवेत नसलेले प्रवासीही अनेक कारणांसाठी गावी जाण्यासाठी बसस्थानकात येतात. पण त्यांना नकार दिला जातो. बस बंद आहे, असे त्यांना सांगितले जाते. त्यामुळे गावी पोहोचण्यासाठी कसरत करण्याची वेळ अनेकांवर ओढवत आहे. तसेच बस जर बंदच राहणार असेल तर केवळ स्वाक्षरीसाठी का बोलावले जाते, असा सवाल चालक-वाहकांकडून विचारला जात आहे.
-------
जिल्ह्यातील एकूण आगार-८
सध्या बसेस चालविल्या जातात-५
प्रवास करणाऱ्यांची संख्या-११०
----
भुसावळला जाण्यासाठी बसस्थानकात बसून
भुसावळ येथे जाण्यासाठी ५ मजूर बुधवारी मध्यवर्ती बसस्थानकात आले होते. तासन्तास बसूनही बस येत नव्हती. त्यामुळे त्यांनी सुरक्षारक्षकाला विचारणा केली. तेव्हा बस बंद असल्याचे सांगितले. कंपनीतून कमी केल्याने भुसावळ येथून रेल्वेने या मजुरांना उत्तर प्रदेशातील गावी परतायचे होते. शेवटी प्रत्येकी ७०० रुपये मोजून हे सर्व जण खासगी वाहनाने भुसावळला रवाना झाले.
-----
जालन्याची बस भरेना
सिडको बसस्थानकात बुधवारी दुपारी १२.४५ वाजता जालना येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी बस उभी होती. बसमध्ये एक प्रवासी बसलेला होता. परंतु जोपर्यंत आणखी प्रवासी मिळत नाही, तोपर्यंत बस जाणार नाही, असे चालकाने सांगितले. शेवटी कंटाळून तो प्रवासी बसमधून उतरून निघून गेला.
----
अत्यावश्यक सेवेला प्राधान्य
सध्या ९० टक्क्यांवर बसेस बंद आहेत. त्यातही मंगळवारी ५ बसच धावल्या. ५ ते ६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचारी, पोलीस यांच्यासाठी बसेस धावत आहेत. अत्यावश्यक सेवा देण्याची कधीही गरज पडू शकते. ही बाब लक्षात घेऊन चालक-वाहकांना आगारात बोलावले जात आहे.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक
------
फोटो ओळ..
१)मध्यवर्ती बसस्थानकात बसच्या प्रतीक्षेत असलेले मजूर.
२)सिडको स्थानकात जालन्याला जाण्यासाठी उभी असलेली बस.