औरंगाबाद : जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत दर शनिवारी आणि रविवारी कडक स्वरूपात लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपूर्वी रेल्वे तिकीट बुकिंग केलेल्यांसह एसटी प्रवाशांत संभ्रम निर्माण झाला आहे. पण या दोन्ही दिवशी रेल्वे आणि एसटी सेवा सुरू राहणार आहे. मास्क आणि कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करत नेहमीप्रमाणे प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारपासून अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच शनिवार, रविवारी कडक स्वरूपात लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या दोन दिवसांच्या कडक लॉकडाऊनदरम्यान एसटी, रेल्वे बंद राहणार का, असा सवाल प्रवाशांतून उपस्थित केला जात होता. परंतु या दोन्ही प्रवासी सेवा नेहमीप्रमाणे सुरळीत राहणार आहेत. त्यामुळे औरंगाबादहून एसटी, रेल्वेने अन्य शहरात जाणाऱ्यांची आणि शहरात येणाऱ्या प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नाही. शनिवारी, रविवारी कडक लॉकडाऊन राहणार असला तरी रेल्वे सुरळीत राहणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही दिवसांपासून प्रवाशांची संख्या कमी होत आहे. मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर गुरुवारी नेहमीपेक्षा कमी प्रवासी पाहायला मिळाले.
एसटी अधिकारी म्हणाले...
जिल्ह्यात शनिवारी, रविवारी एसटी बससेवा सुरळीत राहणार आहे. प्रत्येक प्रवाशाने मास्क वापरणे आवश्यक आहे. मास्क नसेल तर एसटीत प्रवाशाला प्रवेश दिला जाणार नाही.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ
---
रेल्वेंची संख्या- १७
रोज ३ हजार रेल्वे प्रवाशांची ये-जा.
एसटी बसेस- ५५०
एसटी फेऱ्या- ६,२२२
जिल्ह्यातील ८ आगारांतून रोज जवळपास १५ हजार प्रवाशांची ये-जा.