औरंगाबाद : रेल्वेच्या बोगीत धूर पाहून आग लागल्याच्या भितीमुळे प्रवाशांनी नांदेड- अमृतसर सचखंड एक्स्प्रेसमधून उड्या मारल्याची घटना गुरुवारी जालना-बदनापूरदरम्यान घडली. या प्रकाराने भयभीत झालेल्या प्रवाशांनी साखळी ओढून रेल्वे थांबविली. या घटनेनंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तपासणी केली. मात्र, कुठेही आगलेली नसून अफवेमुळे हा गोंधळ उडाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सचखंड एक्स्प्रेस गुरुवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास जालन्याहून रवाना झाली. त्यानंतर अवघ्या काही अंतरावर रेल्वेच्या बोगीत एका प्रवाशाला धूर निघत असल्याचे निदर्शनास पडले. त्याने आग लागल्याची शंका व्यक्त केली. अवघ्या काही वेळेतच इतर प्रवाशांपर्यंत ही माहिती पोहोचली. त्यामुळे प्रत्येक जण घाबरून गेला. यावेळी घाबरलेल्या प्रवाशांनी साखळी ओढून रेल्वे थांबविली. रेल्वेची गती कमी झाली, मात्र, रेल्वे थांबण्यापूर्वीच अनेक प्रवाशांनी सामान बाहेर फेकत उड्या मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.