गंगापूर ( औरंगाबाद ) : बसचालकाने गाडीतील प्रवाशी असलेल्या एका लहान मुलाच्या हातात काही वेळासाठी स्टेरिंग दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी ( १२ सप्टेंबर) एसटी महामंडळाच्या गंगापूर आगाराच्या गंगापूर- उदगीर बसमध्ये घडला. दरम्यान, या प्रकरणात बसचालकाला निलंबित करण्यात आले आहे.
वेळेत, खात्रीशीर व सर्वात सुरक्षित प्रवास अशी एसटीची ओळख आहे. ‘प्रवाश्यांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद वाक्य असले तरी महामंडळाच्या गंगापूर आगारातील चालक आर. बी. शेवाळकर यांनी मात्र कमाल केली असून रविवारी गंगापूर - उदगीर ( क्रं एम एच १३ सीयू ८११०) बस फेरी दरम्यान एका लहान मुलाच्या हातात बसची स्टेरिंग दिली. आंबाजोगाईजवळ हा प्रकार चालकाने केला. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात चालकाने मुलाला आपल्या समोर बसवून स्टेरिंग हातात ठेवलेली आहे. त्यानंतर काही वेळ चालक केवळ मुलाच्याच हातात स्टेरिंग ठेवतो. या प्रकाराने बसमधील तब्बल ४२ प्रवास्यांचा जीव टांगणीला लागला होता.
..मुलगा रडत असल्याने गंगापूर आगाराच्या वतीने चालकाचा जवाब नोंदविण्यात आला आहे. यानुसार चालक शेवाळकर यांनी तो मुलगा नातेवाईक नव्हता, त्याचे रडणे थांबवण्यासाठी काही काळ आपल्यापुढे बसवल्याचा खुलासा केला आहे.
चालक निलंबित धावत्या एसटीचे स्टिअरिंग लहान मुलाच्या हातात देणे चालक शेवाळकर यांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकारची गंभीर दखल घेत गंगापूर आगाराचा चालक आर. बी. शेवाळकर यास निलंबित करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली. तसेच त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता असा प्रकार कोणत्याही चालकाने करू नये, असे अरुण सिया म्हणाले.