औरंगाबाद : प्रवासी म्हणून बसलेल्या दोन जणांनी कारचालकास मारहाण करून कार आणि रोख रक्कम हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि.२७) रात्री १०.२० वाजेच्या सुमारास भांगसीमातागड रस्त्यावर घडली. याप्रकरणी दौलताबाद ठाण्यात दोन आरोपीविरुद्ध गुन्हा करण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, नाशिक येथील सातपूर कॉलनीत राहणारे अमोल जगन्नाथ काळे (वय ३३) हे २७ आॅक्टोबर रोजी रात्री कारने (एमएच-१५ ईई-२००८) ३० ते ३५ वर्ष वयाच्या दोन अनोळखी व्यक्तींना औरंगाबादेत सोडण्यासाठी नाशिक येथून येत होते. निफाड, येवला, वैजापूर, शिवूर बंगलामार्गे शरणापूर फाट्याजवळ दहा वाजेच्या सुमारास ते पोहोचले. आरोपींनी त्यांना करोडीला जायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे काळे यांनी कार करोडी गावाकडे वळवून रेल्वेरूळ ओलांडून भांगसीमातागडामागे पोहोचल्यानंतर आरोपींनी त्यांना मागील मुख्य रस्त्याने गाडी घेण्याचे सांगितले.
पुढे अर्धा किलोमीटरपर्यंत गेल्यावर कच्चा रस्ता लागल्याने काळे यांनी पुढे जाण्यास नकार दिला आणि गाडी थांबविली. दोन्ही आरोपी कारमधून खाली उतरले. त्यांनी काळे यांना शिवीगाळ करीत मारहाण सुरू केली. त्यांनी त्यांच्या मानगुटीला पकडून गाडीच्या खाली ओढून रस्त्याच्या बाजूला नेले. तेथे त्यांना ढकलून देत सव्वातीन लाखांची कार घेऊन पसार झाले. या कारमध्ये तक्रारदार काळे यांची रोख रक्कम होती. या घटनेनंतर त्यांनी कसाबसा रस्ता शोधत दौलताबाद पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.