लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : शेगाव येथे जाण्यासाठी औरंगाबादहून भाड्याची जीप घेऊन निघालेल्या प्रवाशांनीच वाटेत चालकाचा खून करून जीप चोरून नेल्याची खळबळजनक घटना सिल्लोड तालुक्यातील पालोद येथे गुरुवारी मध्यरात्री घडली. खून झालेल्या जीपचालकाचे नाव शेख शकील शेख शब्बीर (३४, रा. नारेगाव, जि. औरंगाबाद) असे आहे. जीप चोरून नेण्यासाठी हा खून झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून, अधिक तपासासाठी पोलिसांनी आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी सकाळी ११ वाजता एका अनोळखी इसमाने जीप मालक इम्रान खान समंदर खान (२८, रा. हर्सूल, औरंगाबाद) यांना फोन करून शेगावला जाण्यासाठी गाडी (क्रूझर जीप) भाड्याने ठरविली. सायंकाळी ५ वाजता चालक शेख शकीलला त्या भाडेकरूचा फोन आला. तीन ते चार लोकांना बसवून ५ वाजता जीप (क्र. एमएच-२० ईई-३४८१) घेऊन शकील औरंगाबाद येथून निघाला. त्यांनी दिल्लीगेटजवळ हॉटेलवर चहा घेतला. रात्री सिल्लोड येथील भराडी नाक्याजवळ एका हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केले. मंगरूळ फाट्यावर आमचे आणखी ६ ते ७ साथीदार येत आहेत. ते आल्यावर आपण शेगावला जाऊ असे म्हणून त्यांनी रात्री १२.३० वाजेपर्यंत ढाब्यावर टाईमपास केला. त्यानंतर ते निघाले. पालोद येथील पेट्रोलपंपासमोरील हॉटेलजवळ जीपमधील प्रवाशांनी तीक्ष्ण हत्याराने चालकाच्या गळ्यावर, छातीवर वार करून त्यास रस्त्याच्या बाजूला एका खड्ड्यात फेकून दिले. जखमी अवस्थेत जीपचालकाने मालकाला फोन केला. मुझे बचाव...ये लोग मुझे मार रहे है... अन् फोन कट झाला. त्यानंतर आरोपी जीप घेऊन पसार झाले. जीप मालकाने लगेच १०० डायल करून कंट्रोल रूम, सिल्लोड ग्रामीण पोलीस व रुग्णवाहिकेला फोन केला. पोलीस व मालक घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत आरोपी जीप घेऊन पसार झाले होते. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वाहन चोरीसाठीच हा खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी जीप चालकाचा मृतदेह सिल्लोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. आरोपींना लवकरच जेरबंद करू, असा विश्वास सहायक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी व्यक्त केला.
पालोदजवळ प्रवाशांनीच चालकाचा खून करून जीप पळविली
By admin | Published: July 15, 2017 12:45 AM