औरंगाबाद : शहरातील दोन सराफा व्यापाऱ्यांनी दागिने बनविण्यासाठी दिलेले जवळपास ६० तोळे सोने घेऊन बंगाली कारागीर पसार झाला आहे. सुमारे तीन लाख रुपये किमतीचे सोने घेऊन दोन्ही सराफा व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या कारागिराचा पोलीस शोध घेत आहेत.
शेख असदउल्ला शेख लियाकत (हल्ली मु. मोमीनपुरा, मुळगाव मालबा, जि. वर्धमान, पश्चिम बंगाल) असे फरार कारागिराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडको, एन-३ येथील रहिवासी अजय गोवर्धनदास मेवलानी (४५) यांची कासारी बाजार आणि मुलमची बाजार या दोन ठिकाणी दागिने विक्रीची दुकाने आहेत. ते स्वत:ही दागिने तयार करतात. मागील दीड वर्षांपूर्वी त्यांची व दागिने बनविणारा कारागीर शेख असदउल्ला याच्यासोबत ओळख झाली होती. त्यामुळे मेवलानी हे त्याच्याकडे नेहमी सोने देऊन दागिने बनवून घ्यायचे. चार ते पाच दिवसांनंतर दागिने तयार करून शेख असदउल्ला हा मेवलानी यांना ते आणून द्यायचा. त्यानंतर ठेवलेली मजुरी त्याला दिली जायची. ५ मार्च रोजी सायंकाळी मेवलानी यांनी शेख असदउल्ला याच्याकडे सोन्याचे बिस्किट, लगड आणि दुरुस्तीसाठी म्हणून काही दागिने असे एकूण तब्बल ३५ तोळे सात ग्रॅम सोने दिले होते. सोने घेऊन गेल्यानंतर शेख असदउल्ला हा कारागीर मेवलानी यांच्याकडे फिरकलाच नाही. नेहमीप्रमाणे चार-पाच दिवस झाल्यानंतर काही दिवस वाट पाहून मेवलानी यांनी शेख असदउल्ला याला मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचा मोबाइल बंद होता. त्यामुळे ते मोमीनपुरा भागातील त्याच्या खोलीवर गेले. तेव्हा त्या खोलीला कुलूप लावलेले होते. मेवलानी यांनी आजूबाजूला चौकशी केली, तर तो काही दिवसांपासून गावी गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मेवलानी यांनी पश्चिम बंगाल येथे राहणाऱ्या त्याच्या वडिलांना फोनवरून विचारणा केली. तेव्हा असदउल्ला घरी आला होता; परंतु काही दिवसांपूर्वी तो येथून निघून गेल्याची माहिती मिळाली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मेवलानी यांनी बुधवारी सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अशाच प्रकारे शहरातील आणखी एका सराफा व्यापाऱ्याचे २३ तोळ्यांचे सोने घेऊन तो पळून गेल्याची घटना समोर आली असून, त्याला क्रांतिचौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक मुजगुले करत आहेत.