औरंगाबाद : पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शनिवारी (दि.१७) सायंकाळी अचानक शहरात गस्तीवरील सुमारे एक डझन पोलीस व्हॅनवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस नियंत्रण कक्षामार्फत निरोप पाठवून आकाशवाणी चौकात तात्काळ येण्याचे आदेश दिले. जीपीएसने जोडलेल्या सर्व पोलीस व्हॅन निर्धारित वेळेपूर्वी आकाशवाणी चौकात दाखल झाल्याने परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. बाराहून अधिक पीसीआर कार, पोलीस व्हॅन अचानक आकाशवाणी चौकात दाखल झाल्याने सर्वसामान्य नागरिक आश्चर्यचकित झाले.वाहनांना जीपीएस लावल्यापासून प्रत्येक वाहनाने किती किलोमीटर गस्त घातली, यावर लक्ष ठेवण्यात येते. एखाद्या एरियात चोरीची घटना घडली, त्यावेळी पोलिसांचे वाहन त्या भागात होते अथवा नव्हते, याबाबत नियमित पडताळणी केली जाते. गस्तीवरील अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस अलर्ट असतात अथवा नाही याची पडताळणी करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी शनिवारी सायंकाळी त्यांची परीक्षा घेतली. पोलीस नियंत्रण कक्षाद्वारे गस्तीवरील टू मोबाइल व्हॅन, वन मोबाइल व्हॅन, पीसीआर व्हॅन यांना वायरलेसद्वारे निरोप पाठवून, आहे तेथून आकाशवाणी चौकात दाखल होण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच अवघ्या काही मिनिटांत दामिनी पथक सर्वप्रथम आकाशवाणी चौकात आले. त्यानंतर शहरातील विविध भागांत आणि वाळूज तसेच दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवरील वाहने आकाशवाणी चौकात आली. सर्व वाहने अपेक्षित वेळेत दाखल झाल्यानंतर त्यांना हा पडताळणी कॉल असल्याची माहिती देण्यात आली.
आयुक्तांच्या परीक्षेत पोलीस उत्तीर्ण
By admin | Published: June 18, 2017 12:53 AM