लोकमत न्यूज नेटवर्कबीड : औरंगाबादेत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पासपोर्ट कार्यालय सुरू झाले. केवळ ५० आॅनलाईन अर्ज स्वीकारण्याच्या मर्यादा आता १५० वर करण्यात आली आहे. तरीदेखील १२ जूनपर्यंतची प्रतीक्षा यादी आहे. बीड जिल्ह्यासाठी देखील लवकरच स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याच्या हालचाली मुंबई पासपोर्ट कार्यालयाच्या वतीने सुरू झाल्या आहेत. पासपोर्ट कार्यालयासाठी मराठवाड्यातील नागरिकांना मुंबईच्या वाऱ्या आर्थिक कटकटीच्या ठरल्या होत्या. अचानक औरंगाबादची सेवा रद्द झाल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले होते. नागरिकांच्या सततच्या पाठपुराव्याने अखेर पासपोर्ट कार्यालय औरंगाबादेत सुरू झाले अन् बीड- औरंगाबादवासीयांची सतत छावणीतील पासपोर्ट कार्यालयात कागदपत्रांची पूर्तता व अर्जाची चाचपणी करून घेण्यासाठी झुंबड उडाली आहे. कार्यालयावर वाढती गर्दी लक्षात घेता आता बीडसाठीदेखील स्वतंत्र कार्यालय करण्याच्या उपाययोजना सुरू आहेत. बीडसाठी या सत्रात कार्यालय सुरू केले जाणार आहे, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. गुजरात, कर्नाटक प्रमाणेच महाराष्ट्रातील औरंगाबादेतील कार्यालय यशस्वी झाल्याने पोस्ट कार्यालयाच्या मदतीने पासपोर्ट कार्यालयाच्या कामाला पुन्हा चालना मिळाली आहे. त्यामुळे देशातील ८४५ पोस्ट कार्यालयांत ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे. बीडच्या नागरिकांना आॅनलाईन नोंद तर होते; परंतु औरंगाबादेत येऊन पासपोर्टसाठी कागदपत्रांची तपासणी व मुलाखतीसाठी यावे लागते. त्यांचीही गर्दी वाढतच असल्याने औरंगाबाद कार्यालयाचा भार कमी करण्यात येत आहे. नागरिकांच्या सेवेसाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने औरंगाबादनंतर आता बीडसाठी कामाला वेग आला आहे. त्यामुळे वाऱ्यादेखील थांबणार आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
बीडमध्ये लवकरच पासपोर्ट कार्यालय
By admin | Published: May 17, 2017 11:33 PM