लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील सर्वच राज्य महामार्गांची दुरवस्था झाली आहे़ खड्डा नसलेला एकही रस्ता जिल्ह्यात नाही़ त्यामुळे ‘खड्डे मुक्त रस्ता’ या अभियानाचा जिल्ह्यात पार बोजवारा उडाला आहे. जिल्ह्यातील चारही बाजुचे रस्ते खड्डेमय झाल्याने खड्डे सुरू झाले की जिल्ह्याची हद्द सुरू झाली, असे प्रवाशांना लक्षात येते़ परभणी-गंगाखेड या रस्त्याची तर अक्षरश: चाळणी झाली असून, वाहनधारक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत़ खड्ड्यांमुळे रस्ता खिळखिळा झाला आहे़ परभणी-गंगाखेड या रस्त्यावर गुडघ्या इतके खड्डे पडले असून, काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘नरेंद्र मोदी बुलेट एक्सप्रेस मार्ग’ असे रस्त्याचे उपहासात्मक नामकरण करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत़ आभाळच फाटल्याची स्थिती असून, ठिगळे द्यायची तरी किती, असा प्रश्न आहे. त्यामुळे आता ‘खड्डेमुक्त रस्ते’ अभियान पुरेसे नसून निधीची आवश्यक ती तरतूद करून सर्वच रस्त्यांची नव्याने बांधणी करण्याची गरज आहे़दुरवस्था झालेल्या रस्त्यांचा अग्रक्रम लावला तर परभणी-गंगाखेड या रस्त्याचा राज्यात वरचा क्रमांक येईल़ ४५ किमी अंतराचा हा रस्ता जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे खिळखिळा झाला आहे़ मागील सहा महिन्यांत जिल्ह्यातील खड्ड्यांचे प्रश्न वृत्तपत्र आणि सोशल मीडियातून गाजत असताना प्रशासनाकडून मात्र ठोस उपाययोजना झाली नाही़गंगाखेड-परभणी हा राज्य महामार्ग असून, जिल्ह्यातील सर्वाधिक वाहतुकीचा रस्ता आहे़ मात्र या रस्त्यावर गुडघ्याइतके खड्डे पडले आहेत़ प्रत्येक एक फुटावर दुसरा खड्डा असल्याने रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे़ शहराला जोडणारा एकही रस्ता धड नसल्याने बांधकाम विभागाचे अस्तित्वच नाहीसे झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे़ एक महिन्यापूर्वी गंगाखेड रस्त्याच्या दुरवस्थेला कंटाळून समाजसेवकांनी उपहासात्मक या रस्त्याचे ‘नरेंद्र मोदी बुलेट हायवे’ असे नामकरणही केले़ रस्त्याच्या दुरवस्थेची ओरड वाढत चालल्याने दोन दिवसांपूर्वी डागडुजीचे काम सुरू झाले आहे़ ते देखील शहरापुरतेच मर्यादित आहे़
खड्डेच सांगतात परभणीची हद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:03 AM