छत्रपती संभाजीनगर : उपग्रह, सॅटेलाइटच्या माध्यमातून घेतलेल्या छायाचित्रांचे मायक्रो डिटेक्शन होण्यासाठी केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने २३ कोटी रुपये खर्चांचा वेगवेगळ्या पातळ्यांवरील संशोधनासाठी एक प्रकल्प जाहीर केला होता. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणकशास्त्राचे तत्कालीन विभागप्रमुख तथा लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. व्ही. काळे यांच्या संशोधकांच्या टीमने छायाचित्रांचे मायक्रो डिटेक्शन करणारे डीएसटी निसा सॉफ्टवेअर विकसित केले होते. त्यास ७ डिसेंबर रोजी केंद्र शासनाच्या पेटंट कार्यालयाने पेटंट जाहीर झाले आहे.
उपग्रह, सॅटेलाइटच्या माध्यमातून मिळणाऱ्या छायाचित्रांचे विश्लेषण करण्यासाठी भारताला अमेरिकेच्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने यावर संशोधनासाठी ऑगस्ट २०१६ ते मार्च २०२१ दरम्यान एक प्रकल्प तयार केला. त्यात खडक, बर्फ, पाणी, जंगल, शेतीसह इतरांच्या इमेजिंग डिटेक्शनसाठी वेगवेगळ्या टीम तयार केल्या. त्यात संगणकावर अल्गोरिदम तयार करण्यासाठी त्रिवेंद्रम येथील आयआयएसटी, आयआयटी खरगपूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, आयआयटी मुंबई, कोलकाता येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील संशोधकांच्या टीम तयार केल्या होत्या. या प्रकल्पाचे प्रो. बी. के. मोहन समन्वयक, तर कुलगुरू डॉ. काळे सहसमन्वयक होते. त्यातील डॉ. काळे यांच्या टीममध्ये संशोधक विद्यार्थी धनंजय नलावडे, महेश सोलनकर, हनुमंत गीते आणि रूपाली सुरासे यांनी काम केले. या संपूर्ण टीमने डीएसटी निसा हे सॉफ्टवेअर विकसित केले. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून उपग्रह, सॅटेलाइटच्या माध्यमातून आलेल्या अतिशय क्लिष्ट अशा छायाचित्रांचेही तत्काळ विश्लेषण केले जाते. हे सॉफ्टवेअर देशातील सर्वच संशोधकांना संशाेधनासाठी उपलब्ध (ओपन सोर्स) करून देण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. के. व्ही. काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
घरबसल्या माहिती मिळणारया संशोधनानुसार उपग्रहाने शेती, जंगल, पाणी, बर्फ आदींविषयीचे छायाचित्र पाठविल्यानंतर त्यांचे अतिशय मायक्रो डिटेक्शन करता येणार आहे. त्यासाठी अमेरिकेसह इतर देशांच्या तंत्रज्ञानाची गरज लागणार नाही. तसेच दुष्काळ, पिकांची नासाडी, पिकांवर पडलेल्या रोगराईचा शोध घेण्यासह तीव्रताही समजून घेता येणार आहे.
चार पेटंट मंजूर, ९ प्रकाशितकुलगुरू डॉ. के. व्ही. काळे यांनी केलेल्या चौथ्या संशोधनाला पेटंट जाहीर झाले आहे. त्याशिवाय त्यांनी पेटंट मिळविण्यासाठी इतर ९ संशाेधनांचे प्रस्ताव पेटंट कार्यालयाला सादर केलेले असून, ते प्रकाशित झाले आहेत. त्यांनाही येत्या काळात पेटंट जाहीर होईल, असा विश्वास कुलगुरू डॉ. काळे यांनी व्यक्त केला.