औरंगाबाद : जालना रोडवरील दूध डेअरीच्या जागेवर २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नावाने ‘पीआर’ कार्ड तयार झाले असून, या ठिकाणी तळमजल्यासह चार मजले अशी या रुग्णालयाची इमारत प्रस्तावित करण्यात आली आहे. दोन वर्षांत हे रुग्णालय उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
पाच वर्षांपासून जागेचा शोध सुरूहोता. अखेर या रुग्णालयासाठी दूध डेअरीची २१ हजार ८५३ चौ. मी. जागा देण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नावाने ही जागा देण्यात आली असून, त्या संदर्भातील ‘पीआर’ कार्ड बुधवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांना प्राप्त झाले. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनी जागेची पाहणी केली.
दोन वर्षात रुग्णालय उभा राहील रुग्णालयाची जागा नावावर झालेली आहे. इमारत, निवासस्थानाचे नियोजन करण्यात आले आहे. दोन वर्षांत हे रुग्णालय उभारण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केला जाईल. महिला आणि नवजात, मुदतपूर्व, कमी वजनाच्या नवजात शिशूंवर या ठिकाणी उपचार होतील.- डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक