औरंगाबाद: व्हॉट्सअॅप ग्रुपवर विरोधात कमेंट केल्याने रविवारी मोईन महेमूद पठाण (वय ३५,रा. फातेमानगर) या प्लॉटिंग एजंटवर १५ ते २० जणांनी धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या केली होती. या प्रकरणी औरंगाबादपोलिसांनी आज सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, चार दिवसांपूर्वी मोईन यांनी एका वॉट्सअप ग्रुपवर टाकलेल्या मेसेजमध्ये काही जणांची कुत्रे अशी संभावना करत, "एक डॉग व्हन आनेवाली है, जिसमे हर्सूल गावके कुच्छ एसान फरामोश कुत्ते आपस के घर के चुव्वे जो घर कें खा के घरवालोको काट ते. सबको एकसाथ पकडकर ले जायेंगे, वो गाडी आ गई सिर्फ पासिंग बाकी है मार्च मै हो जायेंगी " अशी पोस्ट टाकली.
यावरून वाद होत पठाण यांच्या विरोधकांनी त्यांना आव्हान देत रविवारी सायंकाळी हर्सूल गावातील फातेमानगर चौकात बोलावले. यानंतर १५ ते २० जणांनी पठाण यांच्यावर तलवार, चाकू, रॉड आणि लाठीने हल्ला करून त्यांची भर चौकात निर्घृण हत्या केली. यावेळी पठाण यांच्या मदतीसाठी धावलेला त्यांचा भाचा इरफानसुद्धा गंभीर जखमी झाला.
याप्रकरणी १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई करत आज जावेद कलंदर पटेल, शेख रहीम उर्फ बाबा रसूल पटेल, शेख आबेद नूर पटेल, आमेर नबी पटेल, तौफिक गुलाब पटेल व सद्दाम सलीम पटेल या सहा आरोपींना अटक केली.