औरंगाबाद : मराठवाड्याचा प्रतिभावान पहिलवान गोकुळ आवारे हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पहिल्या मल्ल सम्राट महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला. पाटोद्याच्या या पहिलवानाने सहा लढतींत पूर्णपणे वर्चस्व राखताना प्रतिस्पर्ध्याला मुसंडी मारण्याची संधीच मिळू दिली नाही.अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदकांची लूट करणारा महाराष्ट्राचा पहिलवान राहुल आवारे याचा लहान भाऊ असणाºया गोकुळ आवारे याने वेल्हे येथे शनिवारी झालेल्या ८६ ते १२५ किलो वजन गटात पहिल्या तीन फेºया सहज जिंकल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत जालना येथील विलास धुळपुळे याच्यावर ८-२ अशी मात करीत उपांत्य फेरी गाठली. त्यानंतर नाशिकच्या हर्षद सतगीर याला ७-३ अशा गुणफरकाने नमवताना दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत गोकुळची गाठ पडली ती सोलापूरच्या गणेश जगताप याच्याशी. या लढतीत गोकुळने प्रारंभीपासूनच आक्रमक पवित्रा अवलंबताना दोन वेळेस पट काढताना ४ गुणांची वसुली केली व अखेरीस ही लढत ६-२ अशी सहज जिंकताना पहिला मल्लसम्राट महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला. या विजेतेपदाबद्दल त्याला चांदीची गदा आणि थार जीप बक्षीस रूपाने देण्यात आली. याआधी गोकुळ आवारे याने २00७ साली औरंगाबाद येथे महाराष्ट्र केसरीत ६६ किलोत कास्य, सांगली येथे २00९ मध्ये ८४ किलोवजन गटात रौप्यपदक जिंकले आहे, तसेच २0१३ पासून नगर, भोसरी आणि नागपूर येथील महाराष्ट्र केसरी गटाच्या माती गटात त्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. अर्जुन पुरस्कारप्राप्त काका पवार यांचे मार्गदर्शन लाभलेल्या गोकुळ याने त्याचा मोठा बंधू राहुल आवारे याच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळत असल्याचे आणि पुढील लक्ष्य २0१८ मध्ये होणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकण्याचे असल्याचे सांगितले.
पाटोद्याचा मल्ल गोकुळ आवारे ठरला मल्लसम्राट महाराष्ट्र केसरीचा मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:51 AM