- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : वेळ बुधवारी दुपारी ३.०६ वाजेची. स्थळ- उस्मानपुऱ्यातील ओरिआॅन सिटी केअर हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागाचे प्रवेशद्वार. याठिकाणी उभ्या रुग्णवाहिकेत रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय रुग्णालयात होते. जवळपास अर्ध्या तासानंतर कुटुंबीय बाहेर येतात आणि व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने घाटीत जावे लागेल, असे रुग्णवाहिकाचालकाला सांगतात. पीपीई कीट घातलेला रुग्णवाहिकाचालक क्षणाचाही विलंब न करता घाटीत पोहोचतो आणि रुग्णाला अपघात विभागात दाखल केले जाते.
ओरिआॅन सिटी केअर हॉस्पिटलसमोर ही रुग्णवाहिका अर्धा तास उभी होती. सदर रुग्ण एमआयटी रुग्णालयातून याठिकाणी आणल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. दुपारी ३ वाजेपासून रुग्णाचे नातेवाईक रुग्णालयात खाट, व्हेंटिलेटर उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करीत होते. त्यादरम्यान दुसरीकडे रुग्णालयाबाहेर उभ्या रुग्णवाहिकेत कोण आहे, नातेवाईक कुठे गेले, अशी विचारणा सुरक्षारक्षकांनी रुग्णवाहिका चालकाकडे सुरू केली होती. रुग्णालयातील कर्मचारी येतील आणि रुग्ण दाखल होईल, या प्रतीक्षेत रुग्णवाहिकाचालक थांबला होता; परंतु कुटुंबीय बाहेर आले आणि व्हेंटिलेटर नसल्याने घाटीत जावे लागेल, मामा तुम्ही घाटीच्या अपघात विभागासमोर पोहोचा, आम्ही मागून येतो, अशी सूचना रुग्णवाहिकाचालकाला केली.
याठिकाणाहून रुग्णवाहिका ३.३२ वाजता रवाना झाली. नातेवाईकही लगेच इतर वाहनांनी रुग्णवाहिकेच्या पाठीमागे निघाले. अवघ्या १३ मिनिटांत म्हणजे दुपारी ३.४५ वाजता रुग्णवाहिका घाटीच्या अपघात विभागासमोर पोहोचली. येथील डॉक्टरांनी रुग्णाला दाखल करून घेत वॉर्ड क्रमांक ११ मध्ये दाखल केले. उपचार सुरू करण्यात आले असून, हा रुग्ण आॅक्सिजनवर असल्याची माहिती घाटीतील डॉक्टरांनी दिली. व्हेंटिलेटरच उपलब्ध नसल्याने रुग्ण दाखल करून घेणे अशक्य होत असल्याचे एमआयटी रुग्णालय आणि ओरिआॅन सिटी केअर हॉस्पिटलच्या प्रशासनाने सांगितले.
एका रुग्णासाठी चौघांची धावपळएका रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी चौघांची धावपळ होत होती. यावेळी प्रत्येक जण स्वत:च्या पातळीवर प्रयत्न करीत होता. खाजगी रुग्णालयासमोरून घाटीकडे रवाना होताना व्हेंटिलेटर उपलब्ध झाले तर घाटीतून पुन्हा खाजगीत येऊ, असा दिलासा नातेवाईक एकमेकांना देत होते. या सगळ्यात रुग्णालाही दिलासा देण्याचे काम त्यांनी केले.
घाटीत वरिष्ठांकडून दखलरुग्णवाहिकेत ताटकळेला रुग्ण, रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईकांची सुरू असलेली धावपळ ‘लोकमत’चे प्रतिनिधी टिपत होते. रुग्ण घाटीला रवाना होताना ‘लोकमत’ प्रतिनिधीने घाटीतील वरिष्ठ डॉक्टरांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर सदर रुग्ण अपघात विभागासमोर पोहोचताच डॉक्टरांनी रुग्णास तात्काळ दाखल करून घेतले.