उन्मेष पाटील । लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अपघातात जखमी झालेला रुग्ण दाखल होतो. उपस्थित डॉक्टरांकडून त्याच्यावर प्रथमोपचार केले जातात. हाताला जबर मार लागल्यामुळे वेदना असह्य झाल्या होत्या. परंतु, एक्सरे काढल्याशिवाय मार किती व कोठे लागला हे कळू शकणार नाही, असे सांगत डॉक्टरांनी एक्सरे काढण्याचा सल्ला दिला. याचवेळी रुग्णालयातील ही सेवा बंद होती. त्यामुळे संबंधित अपघातग्रस्तास हाताच्या वेदना सोसत रुग्णालय सोडावे लागले.१० मे रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून ग्रामीण रुग्णालय परिसरात बिनटाका शस्त्रक्रिया करण्यासाठी तालुक्यातील मंगरुळ, मोहा या भागातून जवळपास ६९ महिला आल्या होत्या. या महिलांसोबत त्यांची लहान मुले व नातेवाईकही होते. या महिलांची नोंदणी तसेच त्यांच्या शस्त्रक्रियापूर्र्व औषधोपचार करण्यासाठी डॉक्टर तसेच परिचारिकांची धावपळ सुरु होती. रुग्णालयात एका वैद्यकीय अधिकाऱ्याची जागा रिक्त आहे. त्यामुळे वैद्यकीय अधीक्षक तसेच इतर दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना ही रिक्त जबाबदारी भरुन काढावी लागते. या ६९ महिलांना ११ मे रोजी होणाऱ्या शस्त्रक्रिया शिबिरासाठी रुग्णालय व्यवस्थापनाने दाखल करुन घेतले व त्यांच्यासोबत एका नातेवाईकाला थांबण्याची परवानगी दिली.उपजिल्हा रुग्णालयाला दर्जा मिळाला असला तरी येथे ग्रामीण रुग्णालयाच्याही पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. या ६९ महिलांबरोबर आलेल्या त्यांच्या लहान मुलांना व इतर नातेवाईकांना रात्रभर उघड्यावरच मुक्काम करावा लागला. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी येथे धर्मशाळेप्रमाणे एखादी व्यवस्था करावी, अशी मागणी फार जुनी आहे. पण त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे बुधवारी रात्री समोर आलेली रुग्णांच्या नातेवाईकांची परिस्थिती इथे वर्षभर असते, असेही काहीजणांनी सांगितले. काही मंडळींनी रुग्णालयाच्या आवारात तर काही रुग्णालय इमारतीमध्ये जेथे जागा मिळेल तेथे पथारी पसरुन आराम केला. या नातेवार्ईकांना योजनासाठीही विशेष व्यवस्था नसल्याने जेवणही आवारातच आटोपून घ्यावे लागले. रुग्णालय परिसरात भोजन, निवासासाठी वेगळी व्यवस्था करायला हवी, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने अडचण जाणवली नाही. परंतु पावसाचा व हिवाळ्यात मोठे हाल होतात, अशी प्रतिक्रिया ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.
हाताच्या वेदना सोसत रुग्णाने सोडला दवाखाना
By admin | Published: May 12, 2017 12:23 AM