औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाच्या गंभीर रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. कारण गंभीर रुग्ण अधिक आणि व्हेंटिलेटर अगदी कमी, अशी अवस्था आहे. औरंगाबादेत ११२ व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक कार्यालयातर्फे देण्यात आली.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे दररोज रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. यात गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नसल्याने व्हेंटिलेटरच्या प्रतीक्षेत जीव गमवावा लागत असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यावर कोरोनाचे मोठे संकट ओढवले आहे. रुग्णांमध्ये कोरोनासोबतच इतरही गंभीर स्वरूपाच्या आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांची प्रकृती गंभीर असते. परिणामी, त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते. त्यानुसार डॉक्टरही रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्याचा सल्ला देतात; परंतु सद्य:स्थितीत गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपलब्ध व्हेंटिलेटर अपुरे पडत आहेत. ऐनवेळी आवश्यक सुविधा न मिळाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे.
औरंगाबादेत ११२ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत; परंतु ही फक्त कोरोनाग्रस्तांसाठी उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटरची संख्या आहे. इतर आजारांच्या रुग्णांसाठी असलेल्या व्हेंटिलेटरची माहिती सांगितली जात नाही. त्यामुळे कोरोनाचा रुग्ण असो की अन्य गंभीर आजारांचा रुग्ण, त्याच्यावर सध्या व्हेंटिलेटरसाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात जाण्याची वेळ येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे सांगण्यात आले; परंतु रुग्णांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेची स्थिती समोर येत आहे.
घाटीत ११० रुग्ण गंभीरएकट्या घाटी रुग्णालयात ११० गंभीर रुग्ण आहेत. खाजगी रुग्णालयातील संख्याही अधिक आहे. त्यात अचानक प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात धाव घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही जास्त आहे. अशा रुग्णांना रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यातूनच एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात जाईपर्यंत अनेकांचा बळी जात आहे.
घाटीत व्हेंटिलेटर पडताहेत अपुरेघाटीत गंभीर रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्हा रुग्णालयातील तब्बल १८ व्हेंटिलेटर घाटीला देण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे घाटीत व्हेंटिलेटर अपुरे पडत असल्याची परिस्थिती आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या केवळ २ व्हेंटिलेटर आहेत.
केवळ ५ टक्के गंभीर१०० रुग्णांपैकी केवळ ५ टक्के रुग्ण गंभीर असतात, तर या ५ टक्के रुग्णांत केवळ निम्म्या रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता असते. रुग्णांसाठी आवश्यक सुविधा दिली जात आहे. - डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक
रुग्णालयांची ठराविक क्षमताकोविड आणि आणि नॉन कोविड, अशा दोन्ही रुग्णांसाठी व्हेंटिलेटर ठेवावे लागते. खाजगी रुग्णालयांची ठराविक क्षमता असते. शहरातील व्हेंटिलेटरची माहिती घेतली जाईल. - डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा
उपलब्ध व्हेंटिलेटरघाटी ६९जिल्हा रुग्णालय ०२एमजीएम रुग्णालय २०सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल ०८कमलनयन बजाज रुग्णालय ०२डॉ. हेडगेवार रुग्णालय ०८गंगापूर ट्रामा केअर सेंटर ०१उपजिल्हा रुग्णालय, वैजापूर ०१उपजिल्हा रुग्णालय, सिल्लोड ०१