- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : शहरातील आरोग्य यंत्रणा किती अशक्त आहे, याची प्रचीती आता येत आहे. मागील तीन दिवसांपासून शहरातील एकाही रुग्णालयात आयसीयूमध्ये बेड उपलब्ध नाही. त्यामुळे कोविड, नॉनकोविड रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. औरंगाबादहून पुण्याला रुग्ण कार्डियाक अॅम्बुलन्सने रवाना होत आहेत. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी नातेवाईकांची प्रचंड धावपळ पाहायला मिळत आहे.
राज्याच्या पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराची लोकसंख्या १५ लाखांहून अधिक आहे. या लोकसंख्येसाठी शहरातील प्रमुख १६ लहान-मोठ्या रुग्णालयांमध्ये आयसीयूत फक्त ३२६ बेड आहेत. यातील एकही बेड रिकामा नाही. हे बेड मिळविण्यासाठी रुग्णांची रांग लागलेली आहे. रुग्णाला डोळ्यांसमोर मृत्यूच्या खाईत ढकलण्यापेक्षा इतर शहरांमध्ये जाऊन उपचार घेण्यासाठी नातेवाईकांची धडपड सुरू आहे. २ दिवसांपूर्वी हिमायतबाग भागातील एका ज्येष्ठ नागरिकाला न्यूमोनिया झाला. कोरोना तपासणी निगेटिव्ह आली. रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज भासू लागली. शहरात एकाही रुग्णालयात बेड उपलब्ध नव्हते. नातेवाईकांनी बरीच मेहनत घेतल्यानंतर पुण्यात पिंपरी चिंचवड येथे एका रुग्णालयात बेड उपलब्ध झाले. पुण्याहून खास कार्डियाक अॅम्बुलन्स मागून रुग्णाला शिफ्ट करण्यात आले.
मागील ६ महिन्यांपासून शासकीय यंत्रणा कोविडचा मुकाबला करीत आहे. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र, आयसीयूमधील बेड वाढविण्याचा सर्वांनाच विसर पडला. आता परिस्थिती बिकट झाल्यानंतर ‘बेड वाढवा... बेड वाढवा...’ अशी ओरड अधिकाऱ्यांकडून सुरू झाली आहे. पलंग आणि गादी टाकली तर बेड वाढत नाहीत, याचा शासकीय यंत्रणेला बहधा विसर पडला असेल. आयसीयूमधील बेड वाढविण्यासाठी आॅक्सिजन, व्हेंटिलेटर आणि तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचाऱ्यांची गरज असते.
बेड नसल्यामुळे रुग्णांना दिवसभर त्रास
केस १ग्रामीण भागातून आलेल्या एका रुग्णाला मंगळवारी रात्रीपासून व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. या रुग्णाचे नातेवाईक आयसीयूमध्ये बेड मिळवण्यासाठी जंगजंग पछाडत आहेत. सध्या हा रुग्ण सिडको, एन-४ भागातील एमआयटी हॉस्पिटलमध्ये आहे.
केस २एक रुग्ण सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. या रुग्णाला मंगळवारी सकाळपासून व्हेंटिलेटरची गरज भासत आहे. सायंकाळपर्यंत शहरभरात ही सुविधा उपलब्ध करण्यात रुग्णांच्या नातेवाईकांना यश आले नव्हते.
केस ३कन्नड तालुक्यातील एक नॉनकोविड रुग्ण शहरात दाखल झाला. घाटीत या रुग्णाला दाखल करून घेण्यात आले नाही. रुग्णाच्या शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाण ८० पर्यंत आले होते. नातेवाईक इतर रुग्णालयांचे उंबरठे दिवसभर झिजवत होते, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.