स्वच्छतागृहाच्या वापरासाठी महिलांकडून पैसे आकारणी
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात स्वच्छतागृहाची मोफत सुविधा असताना महिलांकडून सर्रास पैशांची आकारणी केली जात आहे. स्वच्छतागृहात जाण्यापूर्वीच पैशांची मागणी केली जाते. महिला काही न बोलता पैसे देतात. याकडे एसटी महामंडळाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
रस्त्यावर खोदकाम,
पण कामाचा विसर
औरंगाबाद : ज्युबली पार्क चौकात ड्रेनेज चेंबर नादुरुस्त झाल्याने गेले अनेक दिवस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सांडपाणी वाहत होते. दुरुस्तीसाठी या ठिकाणी खोदकाम करण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात काम पूर्ण होत नसल्याची स्थिती आहे. रस्त्यावर मातीचे ढिगारे पडून आहेत. त्यामुळे रहदारीला अडथळा येत आहे. काम लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
अजबनगरमध्ये खड्डेमय रस्ता
औरंगाबाद : अजबनगरमध्ये सिमेंट रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना अचानक खड्डेमय रस्त्यावरून जाण्याची वेळ ओढवत आहे. अर्धा सिमेंटचा आणि अर्धा खड्डेमय अशी अवस्था रस्त्याची झाली आहे. उर्वरित रस्ताही सिमेंटचा करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
घाटीत ५३ व्या दिवशीही
कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात गेल्या दीड महिन्यांपासून म्हणजे ५३ दिवसांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरूच आहे. कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यात आल्याचे घाटी प्रशासन म्हटले, मात्र, अपुरे वेतन देण्यात आल्याचे म्हणत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे.