- संतोष हिरेमठऔरंगाबाद : स्पर्धेचे युग, धावपळीची जीवनशैली यासह अनेक गोष्टींमुळे नैराश्य, ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. यातूनच अनेकांचे मानसिक आरोग्य बिघडते. अशा रुग्णांचे ‘टेन्शन’ दूर करण्याचे काम मानसोपचार तज्ज्ञ करतात. परंतु या मानसोपचार तज्ज्ञांना कधीच ताणतणाव, नैराश्य येत नसेल, असा अनेकांचा समज असेल. परंतु मनोरुग्णांची मने बरे करणाऱ्या डाॅक्टरांचेही मानसिक आरोग्य कधी तरी बिघडते. परंतु त्याचे योग्य व्यवस्थापन करून त्यातून वेळीच बाहेर पडत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले.
घाटी, जिल्हा सामान्य रुग्णालय असो की खाजगी रुग्णालये; मानसोपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. मानसोपचार तज्ज्ञ समुपदेशनातून लोकांचे मनोविकार दूर करतात. परंतु त्यांनाही कधी ताणतणाव, नैराश्याला सामोरे जावे लागते का, तेव्हा ते काय करतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. याविषयी घाटीतील मनोविकृती चिकित्साशास्त्र विभागप्रमुख डाॅ. प्रसाद देशपांडे म्हणाले, अनेक कारणांनी मलाही ताणतणाव येताे. परंतु त्याविषयी इतरांशी मी मनमोकळे बोलतो. ज्याच्यावर विश्वास आहे, त्यासमोर व्यक्त होतो. जुनी गाणी ऐकतो. त्यातून ताण दूर होण्यास मदत होते. मनोविकार तज्ज्ञ डाॅ. प्रदीप देशमुख म्हणाले, माणूस म्हणून ताण येतोच. मात्र, घेतलेल्या शिक्षणाचा आणि करीत असलेल्या रुग्णसेवेचा मलाही फायदा होतो. ताणाचा शोध घेऊन त्यावर मात केली जाते.
मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. संदीप सिसोदे म्हणाले, दैनंदिन जीवनात आम्हालाही कधी ना कधी ताणतणावाला सामोरे जावे लागते. त्याची अनेक कारणे असतात. परंतु त्याविषयी इतरांशी बोलले तर फायदा होतो. डाॅ. अतिक पाल म्हणाले, ताणाविषयी कोणाशी बोलले नाही तर त्याचे प्रमाण वाढतच जाते. मित्रपरिवारासोबत बोलून मोकळा होतो.
मन मोकळे करणे फायद्याचेप्रत्येक व्यक्तीत भावना असतात. ताणतणाव, नैराश्य या भावनाच आहेत. या भावना आल्यानंतर त्याचे नियोजन कसे केले जाते, हे महत्त्वाचे असते. ताणतणाव, नैराश्य आल्यानंतर मी मित्रांशी, कुटुंबीयांशी मनमोकळे बोलतो. गाणे ऐकतो. फिरायला जातो.- डाॅ. महेश मरकड, चिकित्सालयीन मानस तज्ज्ञ
परिस्थितीशी जुळवून घेतोकाही गोष्टींमुळे ताण येतो. परंतु परिस्थितीशी जुळवून घेतले की, ताण दूर होतो. ताणतणाव दूर होण्यासाठी इतरांशी त्याविषयी संवाद साधतो. व्यायाम, छंद जोपासणे याचाही फायदा होतो.- डाॅ. पंकज पवार, मनोविकृती चिकित्साशास्त्र विभाग, घाटी