औरंगाबाद : मूळव्याधीच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या तरुणीचा शस्त्रक्रियेदरम्यान प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.३१) सायंकाळी मुकुंदवाडी परिसरातील रुग्णालयात घडली. मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉक्टरविरुद्ध गुन्हा नोंदविला.हेमा अनिल वाघमारे (२२, रा. मुकुंदवाडी) असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, हेमा ही फार्मसीचे शिक्षण घेत होती. गेल्या काही दिवसांपासून तिला मूळव्याधीचा त्रास होत असल्याने वडिलांनी तिला ३१ मे रोजी दुपारी ३ वाजता मुकुंदवाडी येथील डॉक्टर गोरे यांच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तिच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगितले. सायंकाळी साडेसहा वाजता डॉ. गोरे यांनी हेमा हिला शस्त्रक्रियागारात नेले. त्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांनंतर हेमाची प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगण्यात आले. यामुळे नातेवाईकांनी हेमाला सिडको एन-२ येथील डॉ. दंडे यांच्या रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिला अधिक उपचारासाठी घाटीत नेण्याचे सांगितले. तेथून हेमाला घाटीत हलविण्यात आले. तेथे अपघात विभागातील डॉक्टरांनी हेमास तपासून रात्री साडेसात वाजेच्या सुमारास मृत घोषित केले. हेमाच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, चुकीचे उपचार केल्याने तिचा मृत्यू झाला. हेमाच्या मृत्यूस डॉ. गोरे जबाबदार असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले. यावरून पोलिसांनी डॉक्टर गोरेविरुद्ध गुन्हा नोंदविला.रुग्णालयास कुलूप ठोकून डॉक्टर पसाररुग्ण दगावल्याचे कळताच डॉ. गोरे हे शुक्रवारी रात्रीपासून रुग्णालयास कुलूप लावून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोरे यांचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दादाराव कोपनर यांनी दिली.
उपचारादरम्यान रुग्ण तरुणीचा मृत्यू, डॉक्टरविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 11:02 PM