जिल्हा रुग्णालयात लसीकरण बंद
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण बंद करण्यात आले आहे. याठिकाणी गेले काही दिवस अनेकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला. परंतु, आता हे लसीकरण केंद्र बंद करण्यात आले आहे. याठिकाणी रोज लसीसाठी येणाऱ्यांना माघारी फिरावे लागत आहे.
घाटीत लसीचा ठणठणाट
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात मंगळवारी लसीचा ठणठणाट होता. येथे काेवॅक्सिन दिले जाते. परंतु लसीअभावी अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना परत जावे लागले. घाटीतील मनोविकृती विभागाच्या वाॅर्डात लसीकरण केंद्र आहे. याठिकाणी मंगळवारी लस घेण्यासाठी येणाऱ्यांना लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत होते.
कोल्ड स्टोअरेजच्या यंत्राची प्रतीक्षाच
औरंगाबाद : छावणीत उभारण्यात येणाऱ्या कोराना लसीच्या कोल्ड स्टोअरेजच्या यंत्राची (युनिट) ५ महिन्यांनंतरही प्रतीक्षा कायम आहे. दिल्लीहून हे यंत्र औरंगाबादेत येणार आहे. परंतु, या यंत्राकडे डोळे लावून बसण्याची वेळ आरोग्य विभागावर आली आहे. यंत्राअभावी कोल्ड स्टोअरेज अर्धवट अवस्थेत आहे.
मेटल डिटेक्टर धूळखात
औरंगाबाद : रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयाच्या आवारात गेल्या काही दिवसांपासून मेटल डिटेक्टर धूळखात पडून आहे. हे मेटल डिटेक्टर दुरुस्त करून रेल्वे स्टेशनवर वापरण्याची आवश्यकता आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची स्थिती आहे.