लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयात हजारो रुपये खर्चून लावलेले काही वॉटर कूलर नादुरुस्त झालेले आहेत, तर काही वॉटर कूलरमधून चक्क गरम पाणी मिळते. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांचा घसा कोरडाच राहत असून घोटभर थंड पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येत आहे.घाटी रुग्णालयात रुग्ण आणि नातेवाईकांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी वॉटर कूलर लावण्यात आले आहेत; परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे वॉटर कूलर शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.थंड पाण्यासाठी दिलेल्या सुविधेद्वारे चक्क गरम पाणी येत आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाळ्यात गरम पाण्याने तहान कशी भागवणार,असा संतप्त प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांमधून विचारला जातआहे.अपघात विभागातील तीन वॉटर कूलर नादुरुस्त आहेत. पाण्याअभावी वॉटर कूलर कोरडेठाक पडले आहेत. अर्धा उन्हाळा उलटूनही त्यांची दुरुस्ती झालेली नाही. याच ठिकाणी एक वॉटर कूलर सुरू आहे; परंतु त्यातूनही गरम पाणी येत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना बाटली घेऊन थेट रुग्णालयाच्या बाहेरचा रस्ता धरावा लागत आहे. पाणी कुठे मिळते, याची विचारणा करीत एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी फिरण्याची नामुष्की ओढावत आहे.वॉटर कूलरच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छताही पसरलेली आहे. रुग्णालयात पाण्यासारखी मूलभूत सुविधा देण्याचेही टाळले जात आहे. त्याचा फटका रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे. बाह्यरुग्ण, अपघात विभाग, मेडिसिन विभागासह रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची नुसती शोधाशोध करण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर ओढावत आहे. त्याकडे घाटी प्रशासन कानाडोळा करीत आहेत.
नातेवाईक तहानलेलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 1:25 AM