लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : माणिक हॉस्पिटलच्या तळमजल्यात अचानक आग लागली आणि अवघ्या काही क्षणांत संपूर्ण रुग्णालय धुराने कोंडले गेले. तळमजल्यापासून तर चौथ्या मजल्यापर्यंत रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना श्वास घेणेही अवघड झाले. गंभीर आजारी रुग्णांसह रुग्णालयातून बाहेर पडण्यासाठी एकच धावपळ झाली. त्यानंतर उपचारासाठी अन्य रुग्णालयांत दाखल होईपर्यंत रुग्णांचे हाल झाले.आग लागल्याची माहिती पसरताच रुग्णालयात एकच पळापळ सुरू झाली. आगीमुळे विद्युतपुरवठा खंडित झाला. तळमजल्यातील आगीने सर्वांत वरच्या मजल्याच्या खिडक्यांतून धुराचे लोट बाहेर पडत होते. तळमजला आणि पाय-या यामध्ये अगदी कमी अंतर आहे. त्यामुळे दुस-या, तिस-या मजल्यावरील रुग्ण, नातेवाईक, कर्मचारी पायºयांवरून खाली उतरून बाहेर पडणे अवघड झाले. रुग्णालयातील बहुतांश भाग धुराने वेढला गेला. विभागांमध्ये दाखल रुग्ण आणि नातेवाईकांनी धूर आतमध्ये येऊ नये म्हणून दरवाजे लावून घेतले; परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. श्वास गुदमरत असल्याने प्रत्येक जण बाहेर पडण्यासाठी आटापिटा करीत होता. अग्निशमन, पोलीस प्रशासन व नागरिकांच्या मदतीने रुग्णालयाच्या खिडकीतून रुग्णांना बाहेर काढले. अनेक रुग्णांना सलाईन लावण्यात आलेली होती. थेट दुस-या, तिस-या मजल्यावरून शिडी आणि झोळीच्या आधाराने रुग्णांना बाहेर काढताना चांगलीच कसरत करावी लागली. हृदयरोग, अस्थिरोग, रक्तदाब अशा विविध आजारांच्या रुग्णांवर उपचार सुरू होते. काही रुग्ण ‘आयसीयू’मध्ये दाखल होते. त्यांना पुढील उपचारासाठी डॉ. हेडगेवार रुग्णालय, सिग्मा हॉस्पिटल, रोपळेकर हॉस्पिटल आणि जे.जे. प्लस रुग्णालयात हलविण्यात आले. सिग्मा हॉस्पिटलमध्ये तीन रुग्ण आले, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय रोटे यांनी दिली, तर दोन बालके दाखल झाल्याची माहिती रोपळेकर हॉस्पिटलचे संचालक डॉ. सतीश रोपळेकर यांनी दिली.
बाहेर पडण्यासाठी रुग्णांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 1:34 AM