शेख महेमूद तमीज, वाळूज महानगरराष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पाटोदा ग्रामपंचायतीने गावात एटीएम कार्डद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. अवघ्या तीन रुपयांत ग्रामस्थांना १० लिटर शुद्ध पाणी मिळेल.पाटोदा ग्रामपंचायतीने नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांना मोफत दळण, आगाऊ कर भरणाऱ्या नागरिकांना संसारोपयोगी साहित्याची भेट, गरोदर मातांसाठी मदर केअर सेंटर, गुटखाबंदी इ. उपक्रम राबविले आहेत. या ठिकाणी राबविण्यात येणारे कल्याणकारी उपक्रम राज्यभर राबविण्याचा मनोदय ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखाने घातक रसायनमिश्रित सांडपाणी उघड्यावर सोडत असल्यामुळे या परिसरातील जलस्रोत दूषित झाले आहेत. परिणामी, बोअर, विहिरी व हातपंपाचे पाणी दूषित झाले असून दूषित पाण्यामुळे या भागातील नागरिकांना कावीळ, गॅस्ट्रो आदी आजारांचा कायम सामना करावा लागतो.ग्रामपंचायतींनी एमआयडीसीकडून पाणी घेऊन गावात पाणीपुरवठा सुरू केला. मात्र, एमआयडीसीच्या पाण्याचा दर जास्त असल्यामुळे पाटोदा ग्रामपंचायतीने गावात नाममात्र दरात शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी गतवर्षी बीओटी तत्त्वावर जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू केला होता. या केंद्रावरून ८ रुपयांत २० लिटर पाणी पुरविण्यात येत होते. मात्र, हा दरही सर्वसामान्यांना परवडणारा नसल्यामुळे एटीएम केंद्राद्वारे नाममात्र दराने पाणीपुरवठा करण्याचा संकल्प माजी सरपंच भास्करराव पा. पेरे, सरपंच दत्तात्रय शहाणे, उपसरपंच हरिश्चंद्र मातकर, ग्रामविकास अधिकारी आर.डी. चौधरी व पदाधिकाऱ्यांनी केला.
पाटोद्याला एटीएम कार्डद्वारे शुद्ध पाणी
By admin | Published: August 24, 2014 1:18 AM