औरंगाबाद : कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच शहरात राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग घेतला आहे. भाजपची जन आशीर्वाद यात्रा, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आगमनाचे औचित्य साधून कार्यकर्ते, नेत्यांनी जालना रोडला चक्क होर्डिंग रोड करून टाकले होते. त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच महापालिकेने होर्डिंग काढण्याची मोहीम सुरू केली. कॉंग्रेस, भाजपसह विविध पक्ष, संघटनांचे छोटे ७००, मोठे २०० होर्डिंग काढले. त्यामुळे काही स्थानिक कॉंग्रेस नेते संतप्त झाले. कारवाईच्या ठिकाणी येऊन त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत वादही घातला. यानंतरही महापालिकेने कारवाई थांबविली नाही.
शहरात कोठेही अनधिकृत होर्डिंग लावू नये असा आदेश खंडपीठाने दिला आहे. अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याची जबाबादारी महापालिकडे सोपविण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी जालनारोडवरीलतब्बल ६६ लहान मोठे होर्डिंग जप्त करण्यात आले होते. सोमवारपासून केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची जनआर्शीवाद वाद यात्रा सुरू झाली. यात्रेचा समारोप औरंगाबादेत होणार आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते नेत्यांनी जालना रोडवर मोठ-मोठे होर्डिंग, पोस्टर, बॅनर लावले. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेही फोटो होते. त्याचप्रमाणे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शहरात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी जालना रोडवर जिथे जागा दिसेल तेथे होर्डिंग, बॅनर लावण्यात आले. यामध्ये राज्यमंत्री अशोक चव्हाण यांचेही फोटो होते. महापालिकेने क्रांती चौकापासून मोहिमेला सुरुवात केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारे होर्डिंग काढण्यास सुरुवात झाली. मोहीम मुकुंदवाडी, चिकलठाणा येथे पोहोचली. तेव्हापर्यंत कॉंग्रेसचे स्थानिक नेते, माजी नगरसेवक कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत वाद घालायला सुरूवात केली. खंडपीठाने यापूर्वी दिलेल्या निर्देशानुसार कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नेते, कार्यर्त्यांनी वादाला पूर्णविराम दिला. ही कारवाई प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, वसंत भोये, आर. एस. राचतवार, इमारत निरीक्षक पंडित गवळी, भास्कर सुरासे आदींनी केली.
चार ट्रकभर होर्डिंगशहराच्या वेगवेगळ्या भागातही मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावण्यात आले आहेत. महापालिकेने फक्त जालना रोडवर कारवाई केली. दिवसभरात तब्बल चार ट्रक भरून होर्डिंग जप्त केले. छोटे ७०० तर मोठे २०० होर्डिंग काढण्यात आल्याची माहिती अतिक्रमण हटाव विभागाने दिली.