गौताळ्यात विविध वन्यजीव असून, आता पट्टेरी वाघाचे दर्शनही झाले, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. वन कर्मचारी नेहमीप्रमाणे सकाळी गस्तीवर असताना पाऊलवाटेने जाणारा वाघ कर्मचाऱ्यांना दिसला. यामुळे वनरक्षक तसेच अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेत येथे यंत्रणा सतर्क केली.
कुणीही जंगलात विनापरवाना प्रवेश करू नये, असा खबरदारीचा इशाराही देण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात नैसर्गिक वातावरणात बदल झाला असून, वनसृष्टीतही वनजीव बिनधास्त फिरताना आढळून येत आहेत.
वन्यजीव शहरात आले, त्यांनी जनावरांवर हल्ला केला अशा घटना अनेकदा घडल्या आहेत; परंतु नैसर्गिक वातावरण वन्यजिवांसाठी उत्तम वातावरण कोरोना काळात झाले असून, जलसाठेही पाण्याने डबडबलेले आहेत. अन्नसाखळी व्यवस्थित झाल्याने शहर, शेतवस्तीवर किंवा पाळीव जनावरांवरील हल्ले देखील कमी झाले आहेत.
वन विभागाने दिला दुजोरा....
गौताळा अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याच्या वृत्ताला वन विभागाने दुजोरा दिला. पाऊलवाटेवरून वाघ जंगलात जाताना गस्तीवरील वनरक्षक व कर्मचाऱ्यांनी पाहिले आहे. त्याच्या पाऊलखुणा मिळाल्या आहेत.
-विजय सातपुते, विभागीय वनअधिकारी, गौताळा
कॅप्शन... गौताळा अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन झाले असून, त्याच्या पाऊलखुणा दिसत आहेत.