छत्रपती संभाजीनगर : जिल्हा मुद्रांक नोंदणी कार्यालयात सहायक नगररचनाकार या पदावर पवन परिहार हा चार वर्षांपासून कार्यरत होता. या काळात त्याने मंजुरी करून पाठविलेली सर्व प्रकरणे संशयाच्या भोवऱ्यात आली आहेत. बदलीसाठी पात्र असतानाही वर्षभर येथेच ठाण मांडता यावे, यासाठी त्याने बदलीही रोखल्याची चर्चा मुद्रांक विभागात मंगळवारी होती. मालमत्तांच्या मूल्यांकनावरून स्टॅम्प ड्युटी ठरविण्यासारखे महत्त्वाचे काम त्याच्याकडे होते. त्याने मूल्यांकनात हेराफेरी केली असल्यास, शासनाच्या महसुलाचेही बरेच नुकसान झाले असल्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुद्रांक अधिकारी विवेक गांगुर्डे यांनी पुणे मुख्यालयाकडे बोट दाखविले. परिहार तीन दिवसांपासून कार्यालयात नाही. मेलवरूनच त्याने रजेचा अर्ज वरिष्ठांना पाठविला आहे. या लाच प्रकरणावरून मुद्रांक विभागातील सगळ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा आहे.
मुद्रांक विभागात नगररचनाकार कशासाठी?दुय्यम निबंधक कार्यालयात नगररचना अधिनियम आणि तांत्रिक माहितीची जाण असणारे कर्मचारी नसतात, त्यामुळे सहायक नगररचनाकार तेथे असतो. रेडीरेकनरप्रमाणे ज्या मालमत्तांचे मूल्यांकन करता येणे शक्य नसते. जसे विकास करारनामा, बक्षीसपत्र, हक्कसोड दस्तांमध्ये जमीन व मालमत्तांचे मूल्य किती, हे काढण्यासाठी नगररचनाकार प्राथमिक प्रस्ताव तयार करून, जिल्हा कार्यालयाकडे पाठवितो. त्यानंतर, तेथून प्रस्ताव पुणे कार्यालयाकडे जातो. त्यानंतर, किती कर आकारायचा, हे ठरते. पहिला प्रस्ताव पाठवितानाच तेथे जी हेराफेरी करायची, ती केली जाते. त्याची पडताळणी होत नाही, यामुळे सहायक नगररचनाकार अव्वाच्यासव्वा रकमेची मागणी करतात.
नेमके काय आहे प्रकरण?चिकलठाणा हद्दीतील गट क्र. ३७७ मधील १७००.१० जमीन मूल्यांकनप्रकरणी तक्रारदार समर्थ इन्फ्रा कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी नोंदणी विभागात हेलपाटे मारत होते. परिहारने संबंधितांना एक एफएसआयवर (चटई निर्देशांक) ४२ लाख रुपयांची रुपयांची स्टॅम्प ड्युटी बसते. एफएसआय दोनपर्यंत वाढवून देण्यासाठी आणि मूल्यांकन माफ करण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती १ लाख रुपयांत व्यवहार ठरला. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. परिहारच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मंगळवारी एसीबीने मुद्रांक विभागात चौकशी केली.
६ कोटींवरून केले ३ कोटी मूल्यांकन....फेब्रुवारी २०२२ मध्ये गारखेड्यातील सिटी सर्व्हे नं.१५३००/१ मधील २१०६ चौ.मी. जागेचा विकास करारनामा करताना मूल्यांकनात पवन परिहार याने फेरफार करताना शासनाच्या महसुलाचे नुकसान केले होते. याप्रकरणी तत्कालीन मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी परिहारला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या जमिनीत सुरुवातीला मालकाच्या हिश्श्याचे मूल्यांकन ५ कोटी ५० लाख ६७ हजार १४८ केेले. दस्तनोंदणीसाठी मूल्यांकन ६ कोटी ४४ लाख ४४ हजार केले. यातून ३२ लाख २२ हजार २०० रुपये मुद्रांक शुल्क मालकाला भरावे लागणार होते. परंतु परिहार याने फेरफार करीत मालकाच्या हिश्श्याचे मूल्यांकन ५ कोटी १७ लाख ५९ हजार केले. तर जमिनीचे मूल्यांकन ३ कोटी ५ लाख ३७ हजार केल्याचा अहवाल सादर केला. यामुळे शासनाचा सुमारे १६ लाखांचा महसूल बुडाल्याचे निश्चित झाले. अशी अनेक प्रकरणे असून त्याची चौकशी होणार आहे.