औरंगाबाद : देशाच्या आर्थिक सुधारणांत शरद पवार यांचे मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शनिवारी येथे काढले. महात्मा गांधी मिशनतर्फे शेषराव चव्हाण यांनी लिहिलेल्या ‘पद्मविभूषण शरद पवार- ए ग्रेट इनिग्मा’ या चरित्रग्रंथाचे डॉ. सिंग यांच्या हस्ते प्रकाशन झाले.पवार यांचे देशाच्या आर्थिक सुधारणांमध्ये मोठे योगदान आहे. पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात मी अर्थमंत्री असताना शरद पवार हे संरक्षणमंत्री होते. आर्थिक सुधारणांसाठी संरक्षण मंत्रालयाच्या बजेटमध्ये कपात करण्यास मंजुरी देणारे ते एकमेव मंत्री होते.आर्थिक सुधारणांची भूमिका त्यांनी त्या आधीही पुणे चेंबर आॅफ कॉमर्सच्या मंचावर स्पष्ट केली होती. पवार हे प्रभावी मंत्रीहोते. मी संकटात असताना त्यांनी मला नेहमीच मदत केली. महाराष्ट्रातील शेती आणि औद्योगिक विकासाचे श्रेयही त्यांनाच जाते, असेही सिंग म्हणाले. यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेऊन माझी वाटचाल चालू आहे. राजकीय जीवनात मला संधी देण्याचे काम दिवंगत विनायकराव पाटील यांनी केले. मी विधिमंडळात जाण्यामध्येही त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी मला पहिल्यांदा बारामतीमधून तिकीट दिले, असे पवार यांनी सांगितले.‘टू- जी स्पेक्ट्रम’चा उल्लेख नाही : टू- जी स्पेक्ट्रम घोटाळ््यातून तत्कालीन दूरसंचारमंत्री ए. राजा व इतरांना क्लीन चिट मिळाल्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांचे देशातील हे पहिलेच भाषण होते. त्यामुळे ते त्यासंबंधी काही बोलतात का, याविषयी उत्सुकता होती. मात्र, डॉ. सिंग आणि पवार यांनी राजकीय वक्तव्ये टाळली.
आर्थिक सुधारणांत पवारांचेही योगदान, मनमोहन सिंग यांचे गौरवोद्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 3:33 AM