औरंगाबाद : महापालिकेने शहरात पार्किंग धोरण तयार करण्याचे काम सुरू केले आहे. शहरातील १३ ठिकाणी पैसे देऊन नागरिकांना वाहन पार्किंग करावे लागणार आहे. यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत. यापूर्वी सहा रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर ‘पे अँड पार्क’ धोरण राबविण्याचा निर्णय झाला आहे. त्यानंतर आणखी १३ ठिकाणे निश्चित करण्यात आली असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांनी सांगितले. यासाठी लवकरच इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत.
महापालिका, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने शहरास पार्किंग धाेरण तयार केले आहे. पार्किंग धोरणात रस्त्यावरील पार्किंगवर भर दिला आहे. शिवाय ऑफ स्ट्रीट पार्किंग, मल्टिलेव्हल पार्किंगचा समावेश केला आहे. आणखी १३ जागा पे अँड पार्कचे धोरण अंतिम करण्यात आले आहे. संत एकनाथ रंगमंदिर, जाफर गेट, सारस्वत बँकेशेजारी, रोशन गेट, जिल्हा न्यायालयासमोर यासह इतर जागांचा विचार केला जात आहे, असे नेमाने यांनी नमूद केले.
सहा ठिकाणी कंत्राटदार नेमलेपार्किंग ऑपरेटर, त्यांच्या जबाबदाऱ्या, कामे, धोरण राबविण्यासाठी टास्क फोर्स तयार करणे, नागरिकांचा सहभाग वाढविणे, व्यावसायिक जागेवर पार्किंग पास देणे आदी बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. निराला बाजार, उस्मानपुरा, कॅनॉट प्लेस, अदालत रोड, पुंडलिक नगर, टीव्ही सेंटर या जागांचा प्रायोगिक तत्त्वावर समावेश करण्यात आला आहे. सहा ठिकाणी ‘पे अँड पार्क’ची अंमलबजावणी करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. कॅनॉट प्लेस भागात काम सुरू करण्यात आले आहे.