औरंगाबाद : शासनाने वारंवार सूचना केल्यानंतर अखेर महापालिकेने शहरात पार्किंगचे धोरण निश्चित केले. याची अंमलबजावणी १ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. पे ॲण्ड पार्क तत्त्वावर नागरिकांना ७ ठिकाणी ही सुविधा देण्यात येणार आहे. प्रारंभी दोन महिने सेवा मोफत असेल, असे स्मार्ट सिटी, मनपा प्रशासनाने कळविले आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवरील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. पार्किंगचे धोरण निश्चित करण्याचे काम मागील काही वर्षांपासून सुरू होते. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि मनपा प्रशासनाने या कामासाठी पुढाकार घेतला. अगोदर पार्किंग धोरण निश्चित करण्यात आले. सोमवारी या धोरणाबद्दलचे सादरीकरण स्मार्ट सिटीच्या कार्यालयात करण्यात आले. त्यानंतर याबद्दलची माहिती स्मार्ट सिटीच्या माध्यम विश्लेषक अर्पिता शरद यांनी दिली.
पे ॲण्ड पार्कसाठी ‘करब्लेट ॲप’ तयार करण्यात आले आहे. हे ॲप आपले वाहन पार्क करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला डाऊनलोड करावे लागेल. हे ॲप डाऊनलोड केल्यावर त्या आधारे पार्किंगच्या जागेवर वाहन पार्क करण्यासाठी जागा आहे का याची माहिती मिळणार आहे. जागा आहे असे लक्षात आल्यावर संबंधित व्यक्तीला वाहन पार्क करण्यासाठी ॲपच्या आधारेच जागा निश्चित करून घ्यावी लागणार आहे. ॲपच्याच आधारे ऑनलाईन पेमेंटची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. पार्किंगच्या जागीदेखील पेमेंटची व्यवस्था केली जाणार आहे. क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांना पार्किंगचे शुल्क भरता येणार आहे.
या ७ ठिकाणांची निवडपार्किंगची सुविधा १ ऑगस्टपासून सिडको कॅनॉटप्लेस, निराला बाजार, उस्मानपुरा, अदालत रोड, सूत गिरणी चौक, पुंडलिकनगर, टीव्ही सेंटर या सात ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाणार आहे. सुरुवातीला दोन महिने ही सुविधा मोफत असणार आहे. १ ऑगस्ट रोजी सिडको कॅनॉट येथे या उपक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे.