छत्रपती संभाजीनगर : महापालिका प्रशासनाने यंदा १ एप्रिलपासूनच मालमत्ता कराच्या वसुलीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात २ लाख ३० हजार मालमत्ताधारकांना पहिल्यादा कर भरण्यासंदर्भात एसएमएस आले. मनपातील अधिकारी, कायमस्वरूपी, कंत्राटी कर्मचाऱ्यांनीही जूनअखेरपर्यंत मालमत्ता कर भरणे आवश्यक आहे. कर भरल्याचा पुरावा न दिल्यास पगार थांबविण्यात येईल. कर्मचाऱ्यांच्या नावाने मालमत्ता नसेल तर तसे प्रशासनाला लिहून द्यावे लागेल. प्रशासनाच्या या निर्णयामुळे कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
२०२३-२४ या आर्थिक वर्षात मनपाने मालमत्ता-पाणीपट्टीच्या माध्यमातून जवळपास पावणेदोनशे कोटी रुपये मिळविले. ‘अब की बार ५०० पार’ अशी घोषणा प्रशासनाने दिली आहे. यंदा चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर, थकबाकी आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये जमा करण्याचा मानस आहे. नागरिकांकडून वसुली करण्यापूर्वी मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वत: कर भरणे आवश्यक आहे. महापालिकेत कायम आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास साडेपाच हजार आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यात कर भरला तर सूट मिळते. जुलै महिन्यापासून व्याज आकारणी सुरू होते. मार्चअखेरपर्यंत तब्बल २४ टक्के व्याजाची आकारणी केली जाते.
थकबाकीवर चक्रवाढ पद्धतीने व्याज लावण्यात येते. मागील आर्थिक वर्षात कर भरल्याची पावती सादर न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार थांबविण्यात आले होते. विविध बँकांकडून कर्ज घेतलेल्या कर्मचाऱ्यांना हप्ते भरता आले नाहीत. मार्च महिन्याचा पगार २२ एप्रिल रोजी झाला. त्यामुळेही कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले. आता जूनअखेरपर्यंत कर्मचाऱ्यांना कर भरल्याची पावती सादर करावी लागेल. अन्यथा जुलै महिन्यात पगार मिळणार नाही. मनपा कर्मचाऱ्यांसोबत स्मार्ट सिटीच्या कर्मचाऱ्यांनाही हा निकष लावावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.