छत्रपती संभाजीनगर : शहरापासून अवघ्या १८ किमी अंतरावर सुरू असलेल्या विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत मास कॉपी झाल्याचा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला आहे. तीनशे रुपयांत परीक्षा संपल्यावर सायंकाळी विद्यार्थी कॉलेजमधून उत्तरपत्रिका नेतात. जवळच्या झेरॉक्स सेंटरवर त्या विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी व्यवस्था केली जाते. नंतर हेच विद्यार्थी केंद्रात जाऊन ती उत्तरपत्रिका गठ्ठ्यात ठेवतात. दरम्यान, एका विद्यार्थिनीने धाडस केले आणि या मास कॉपीचा भांडाफोड झाल्याने एकच खळबळ उडाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी या प्रकाराच्या चौकशीसाठी अधिष्ठातांच्या अध्यक्षतेखाली तीन प्राध्यापकांची समिती नेमली असून, २४ तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश समितीला दिले आहेत. अशा प्रकारांमुळे विद्यापीठाची बदनामी होत असेल, तर दोषी महाविद्यालयांचे संलग्नीकरणदेखील रद्द करण्याची कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. कायद्यानुसार ऐकीव कोणत्याही घटनेवर लगेच कारवाई करता येत नाही. जर केलीच तर ती फार काळ टिकत नाही. त्यामुळे चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर एक तर या कॉलेजचे संलग्नीकरण रद्द केले जाऊ शकते. ते परीक्षा केंद्रही रद्द केले जाईल. आज महावीर जयंतीमुळे पेपरला सुट्टी आहे. उद्या अचानक केंद्र रद्द केले, तर विद्यार्थ्यांची तारांबळ उडेल. त्यामुळे उद्या बुधवारी त्या केंद्रावर विद्यापीठ कॅम्पसमधील दोन प्राध्यापकांचे बैठे पथक परीक्षा होईपर्यंत तैनात केले जाणार आहे. केंद्रावर नजर ठेवण्यासाठी नेमलेले भरारी पथक परीक्षा सुरू असताना कुठे होते? त्या पथकावरही विद्यापीठ कारवाई करणार आहे. याशिवाय एखादा विद्यार्थी पुढे आला, तर पोलिसांतही हे प्रकरण दाखल करण्याची भूमिका विद्यापीठ प्रशासनाने घेतली आहे. शहराला लागून शेंद्रा गावात वाल्मीकराव दळवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हे परीक्षा केंद्र आहे. या केंद्रात पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत हा सावळा गोंधळ सुरू असल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला जाग आली.
अशी चालू होती मास कॉपीची प्रक्रियाशेंद्रा येथे दळवी महाविद्यालयाला लागूनच एक फोटो स्टुडिओ व झेरॉक्स सेंटर आहे. झेरॉक्स सेंटर चालक आणि केंद्राचे कर्मचारी - प्राध्यापक हे तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांपैकी ज्यांना ज्यांना परीक्षेनंतर पेपर सोडवायचा आहे, अशा विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ३०० रुपये जमा केले जातात. तत्पूर्वी, पैसे देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी उत्तरपत्रिकेत मोकळी जागा सोडायला लावली जाते. सकाळी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मग सायंकाळी ४ ते ६ या वेळेत त्यांची उत्तरपत्रिका लिहिण्यास दिली जात असे. त्यानंतर ते विद्यार्थी सेंटरमधील कस्टडीत जाऊन आपली उत्तरपत्रिका ठेवत असत.
सत्य उजेडात आणावेमहाविद्यालयाची बदनामी करण्याचा हा कट असावा. आमच्या महाविद्यालयात असला प्रकार घडला नसल्याचे या परीक्षा केंद्राचे प्रमुख शहाजी तोगे यांचे म्हणणे आहे. तर संस्थाचालक ज्ञानेश्वर दळवी म्हणतात की, या प्रकरणाशी आमच्या महाविद्यालयाचा कुठलाही संबंध नाही. विद्यापीठाने सखोल चौकशी करून सत्य उजेडात आणावे.