औरंगाबाद : जि. प. शिक्षकांच्या वेतनासाठी राज्याच्या शिक्षण विभागाकडून पुरेसे वित्तप्रेषण (बजेट) न मिळाल्यामुळे जि. प. च्या वित्त विभागाने सादर केलेली वेतन देयके कोषागार कार्यालयाने परत केली आहेत. दरम्यान, मार्च महिन्याची १५ तारीख उजाडली तरीदेखील मागील महिन्याचे शिक्षकांना अद्याप वेतन मिळालेले नाही. त्यामुळे शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. जि. प. शिक्षकांच्या वेतनासाठी प्रत्येक महिन्याला विलंब होत आहे. यासंदर्भात मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तमराव चव्हाण यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, शिक्षकांच्या वेतनासाठी शिक्षण विभागाकडून पुरेसे वित्तप्रेषण मिळत नाही. तरीदेखील शिक्षकांचे वेतन दरमहा करावे लागते. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तमराव चव्हाण यांच्या स्वाक्षरीचे संयुक्त हमीपत्र कोषागार कार्यालयास सादर करण्यात आले आहे. त्यामुळे पुरेसे वित्तप्रेषण नसले तरी कोषागार कार्यालय हे शिक्षकांचे वेतन करीत होते. हमीपत्र सादर करताना वेतन केलेल्या त्या महिन्याच्या आत पगारासाठी उचलण्यात येणारी रक्कम कोषागार कार्यालयात भरावी लागते. हा महिना आर्थिक वर्षाचा अखेरचा महिना आहे. त्यामुळे कोषागार कार्यालयाकडून हमीपत्रावरही वेतन अदा केले जात नाही. यासाठी जि. प. वित्त विभागाच्या खास दूतांमार्फत शिक्षण संचालकांचे कोषागार कार्यालयासाठी पत्रही आणले; मात्र कोषागार कार्यालयाने आज सोमवारी शिक्षकांच्या वेतनाची सर्व देयके जिल्हा परिषदेकडे परत पाठविली. आहेत. वेतनाअभावी शिक्षकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. जि.प.चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तमराव चव्हाण यांनी सांगितले की, काहीही झाले तरी येत्या दोन दिवसांत शिक्षकांचे वेतन होईल. त्यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत. शिक्षण संचालकांनी पत्र दिले आहे. आर्थिक वर्ष अखेर असल्यामुळे कोषागार कार्यालयाने वेतनासाठी पुरेसे बजेट नव्हते म्हणून देयके परत पाठविली आहेत. प्राथमिक शिक्षक संघाचे मधुकर वालतुरे, राजेश हिवाळे, काकासाहेब जगताप, कैलास गायकवाड, प्रशांत हिवर्डे, दिलीप साखळे, प्रवीण पांडे या पदाधिकाऱ्यांनी मात्र कोषागार कार्यालयाच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे. जि.प.च्या वित्त विभागाने शिक्षकांच्या वेतनास आणखी जास्तीचा विलंब लावू नये.
दोन दिवसांत वेतन पगाराविना जि. प. शिक्षकांचे हाल
By admin | Published: March 15, 2016 12:30 AM