औरंगाबाद : दिवसेंदिवस वीज बिलांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत तब्बल १ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. दरम्यान, महावितरणने थकबाकी वसुली मोहीम गतिमान केली असून, या मोहिमेत हयगय केल्यामुळे औरंगाबाद परिमंडळांतर्गत १९ अभियंत्यांचे वेतन कपात करण्यात आले आहे, तर ३४ जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
महावितरणने थकबाकी वसुली मोहीम हाती घेतली असून, औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील काही अभियंते व अन्य कर्मचाऱ्यांनी या मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याची बाब मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या निदर्शनास आली. थकबाकी वसुलीची ही मोहीम यशस्वी करण्याच्या सूचना असतानादेखील अभियंते व कर्मचाऱ्यांपैकी काही जणांनी या मोहिमेत हिरीरीने सहभाग घेतला नाही. वसुलीबाबत निष्काळजीपणा दाखविला, थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश असतानादेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील ४ व जालना जिल्ह्यातील १५ अभियंत्यांचे नोव्हेंबर महिन्याचे एकतृतीयांश वेतन कपात करण्याचे आदेश मुख्य अभियंता गणेशकर यांनी दिले. याशिवाय औरंगाबाद जिल्ह्यातील २० व जालना जिल्ह्यातील १४ जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे महावितरणचे अभियंत्यांत व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक विभागातील औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड परिमंडळांतर्गत ११ जिल्ह्यांतील घरगुती, व्यापारी, औद्योगिक ग्राहक, शहरातील पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा व अन्य अशा २ लाख ३० हजार ७०४ वीज ग्राहकांकडे १ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे. महावितरणने वीज बिलाच्या थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात १३२ कोटींची थकबाकी- औरंगाबाद परिमंडळात घरगुती वीज वापराच्या ३४ हजार १९७ ग्राहकांकडे ५२.७० कोटी रुपये - व्यापारी वीज वापराच्या ४ हजार ४८५ ग्राहकांकडे ८.६८ कोटी रुपये - औद्योगिक १ हजार ४७१ ग्राहकांकडे ४.५१ कोटी रुपये- १ हजार ७७९ सार्वजनिक पाणीपुरवठाकडे ५४.५० कोटी रुपये- ४४८ पथदिवे जोडण्यांकडे ८.७८ कोटी रुपये- ९२६ इतर ग्राहकांकडे २.८८ कोटी रुपयेएकूण ४३ हजार ३०६ वीज ग्राहकांकडे १३२.८७ कोटी रुपयांची थकबाकी आहे.