औरंगाबाद : महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राला वेगळे वळण देणारे आणि सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान असलेले डॉ. पी.डी. पाटील यांचा शनिवारी १९ डिसेंबर रोजी सत्कार होणार असून त्यानिमित्त ते मराठवाडा साहित्य परिषदेत संवाद साधणार आहेत. पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच औरंगाबादेत येत असलेल्या डॉ. पी.डी. पाटील यांचा सत्कार भारतीय भटक्या-विमुक्त जमाती, आदिवासी विकास समिती आणि अस्मितादर्श परिवारातर्फे उद्या सायंकाळी साडेचार वाजता मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले राहणार असून, प्रमुख वक्ते म्हणून पत्रमहर्षी, राजकीय भाष्यकार, साहित्यिक मधुकर भावे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्व साहित्यप्रेमींनी, तसेच निमंत्रितांनी यावे, असे आवाहन अस्मितादर्श परिवारातर्फे व भारतीय भटक्या-विमुक्त जमाती, आदिवासी विकास संघटनेमार्फत करण्यात आले आहे. हे पत्रक डॉ. ऋषिकेश कांबळे, अमीनभाई जामगावकर व डॉ.जगदीश कदम यांच्यामार्फत प्रसिद्धीस देण्यात आले.
पी.डी. पाटील आज मसापत साधणार संवाद
By admin | Published: December 18, 2015 11:46 PM