नदी, नाले, ओढ्यांमध्ये ठणठणाटच आहे. विहिरींची पाणी पातळी खालावलेलीच आहे. पावसाचे प्रमाण जेमतेम असल्यामुळे अद्याप पावसाचे पाणी शेतातून वाहिलेले नाही. त्यामुळे नद्या, ओढे यांना पूर आलेला नाही. परिणामी पाझर तलाव, लघु तलाव क्षेत्रात पाणी आलेले नाही. चापानेरसह परिसरातील बोलठेक, गुदमा, जळगाव घाट, आठेगाव, खेडा, जवळी, पळसखेडा, हसनखेडा, चिंचखेडा, शिरसगाव या गावांत जोरदार पावसाची गरज आहे. आतापर्यंत चापानेर मंडळात ३४८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. मृग नक्षत्रात सुरुवातीला चांगला पाऊस झाला. बऱ्याच शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केली. नंतर मृग नक्षत्र कोरडे गेले. आर्द्रा नक्षत्र जेमतेम पडले. त्यानंतर सूर्याच्या पुनर्वसू नक्षत्राचे वाहन उंदीर असल्याने पाऊस पडेल, अशी आशा बळीराजाला होती. मात्र तिन्ही नक्षत्रात पाऊस कमी प्रमाणात पडला. सोमवारपासून सूर्याचा पुष्य नक्षत्रात प्रवेश झाला आहे. या नक्षत्राचे वाहन घोडा आहे. या घोड्यावर शेतकऱ्यांची मदार आहे. जेमतेम पावसावर पिके तरारली असली तरी पाणीसाठ्यात वाढ झाली नसल्याने व दमदार पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
पीक जोमात; पण पाऊस कोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:04 AM